CM Uddhav Thackeray : मुंबई : कोरोना काळात नाटक, चित्रपट सर्व बंद होते, त्यामुळे लोक फुकटचे मनोरंजन सोडत नाहीत अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच सारखे झेंडे बदलायचे, आधी मराठीचा मुद्दा घ्यायचा आणि नंतर हिंदुत्वाची भूमिका घ्यायची हे माकडचाळे सुरू आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन मुलाखत घेतली तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
मशीदींवरील सर्व भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. तसेच ३ मेपर्यंत मशीदींवरील भोंगे उतरवा असा अल्टिमेटमही राज ठाकरे यांनी दिला होता. भाजपने या भूमिकेचे स्वागत केले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाच्या नव्या खेळांडूकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडून कुठल्या कुठल्या मैदानात कुठले खेळ खेळतात हे लोकांनी अनुभवले आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ. दोन वर्षाच्या काळात नाटक, थिएटर सर्व बंद होते. सर्व मनोरंजन बंद होते. लोकांना फुकट करमणूक मिळत असेल तर त्यात काही चुकीचे नाही.
शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे हे मी विधानसभेतही म्हटले आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे आम्ही लपवणार नाही. मार्केटिंगचा जमाना, भोंगेधारी, पुंगीधारी मार्केटिंग करत आहेत. हिंदुत्व आणि मराठीचा खेळ करणार्यांकडे लोक लक्ष देत नाहीत. मविआचे कौतुक करण्याइतपत राज ठाकरेंकडे मोठेपणा नाही. त्यासाठी शेजारी पाजार्यांची मदत घ्यावी लागते. हिंदू हे देशातले असून ते परके नाहीत. आपल्या देशात हिंदू अनेक भाषा बोलतात. आधी मराठीचा मुद्दा घ्यायचा आणि परप्रांतीयांवर हल्ले करायचे आता स्वतःला हिंदुत्वावादी म्हणवून घ्यायचे याला माकडचाळे म्हणातात. महाराष्ट्रातील आणि देशातील नागरिक हे एवढे भोळे नाहीत. हिंदुत्व आमचा श्वास आहे त्यामुळे सारखा आम्हाला हिंदुत्वाचा डंका वाजवायची गरज नाही. तुम्हाला का आपली ओळख सारखी सांगावी लागते? का सारखे सारखे झेंडे बदलावे लागत आहेत. का झेंड्यांचे रंग बदलावे लागतात? शिवसेनेने कधीच झेंडा बदलेला नाही. याबाबत १४ तारखेच्या सभेला मी उत्तर देईन. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेचपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला आजही आदर आणि प्रेम आहे. आजही त्यांचे आणि माझे व्यक्तिगत संबंध आहे. याचा अर्थ आमची युती होईलच असे नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले तसेच भोंग्याबाबत सर्वांनी मर्यादा पाळावी. अजाणतेपणाने भोंग्यांचे राजकारण सुरू आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.