Corona Mimbai Model कोविडविरुद्ध लढ्यासाठी  ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा जगासमोर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करुन कोविड नियंत्रणात आणला त्या ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL

Mumbai Model : मुंबई : कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करुन कोविड नियंत्रणात आणला त्या ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

प्रसिद्ध लेखकमिनाझ मर्चंट लिखित ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा सदस्य अनिल देसाई, ‘महारेरा’ चे अध्यक्ष अजोय मेहता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल  आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोविडचा काळ हा कसोटीचा काळ होता. कोविडशी लढण्याचा जगाला अनुभव नव्हता. कोविडवर उपचार नव्हता तरी त्याचे व्यवस्थापन करु शकत होतो अशी परिस्थिती होती. मार्च २०२० मध्ये कोविड केंद्र सुरु करण्याच्या सूचना दिल्या आणि वांद्रे कुर्ला संकुलात देशातील पहिले जम्बो कोविड रुग्णालय केवळ पंधरा दिवसात महानगरपालिकेने सुरु केले, अजूनही हे रुग्णालय तसेच ठेवले असून या ठिकाणी कायमस्वरुपी पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाची सुविधा निर्माण केली आहे, विविध उपाययोजना करणे हे एक सांघिक काम होते, या संपूर्ण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांच्यात हिंमत जागवली, त्यावेळी या सर्वांनी अतिशय अवघड काम केले. एक कॅप्टन म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे काम आपण केले असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमण्यासह एक-एक गोष्टी शिकत आणि त्या करीत गेलो. लॉकडाऊनच्या काळात मजूर घरी जाण्यासाठी पायी निघाले, रस्त्याने जाणाऱ्या या मजूरांना अन्नाची पाकिटे दिली. केंद्राकडे गाड्यांची त्यावेळी मागणी केली, गाड्यांना परवानगी देण्याची मागणी केली, अतिशय झोप उडवणारा हा काळ होता. अर्थचक्र पूर्ववत करण्यासारखे अनेक प्रश्न होते, ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता, अशावेळी ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू होणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने घेतली आणि ऐन ऑक्सिजनच्या टंचाईत दीडशे रुग्णांना स्थलांतरित केले त्यामुळे मोठी हानी आपण टाळू शकलो असे सांगून कोविड काळात ज्या काही उपाययोजना आपण केल्या त्या माहितीचे संकलन होणेदेखील आवश्यक होते, त्या सर्व गोष्टींची माहिती या पुस्तकात आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

धारावीमध्ये कोविड नियंत्रणात आणला त्याचे जगभरात कौतुक झाले. रुग्णालये, खाटांचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका अशा अनेक उपाययोजना केल्या. बोलणे आणि कृती यातील अंतर कमी केले म्हणून कोविडची यशोगाथा आपण या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडू शकलो असे सांगून कोविडकाळात महापालिका, बेस्ट आणि सर्व यंत्रणांनी न खचता केलेल्या कामाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले आणि हे यश कोविडयोद्ध्यांना अर्पण केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी