Uddhav Thackeray : या केंद्रामुळे नव्या पिढीचे मातीशी नाळ जुळेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Centre of Excellence नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.

थोडं पण कामाचं
  • खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन
  • या केंद्रामुळे नव्या पिढीचे मातीशी नाळ जुळेल
  • नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम अभिनंदनीय

Uddhav Thackeray : मुंबई : नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्समुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मातीशी नाळ जोडली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची  मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.

स्पोर्ट सिटीचा उदय

खारघर हे शहर भविष्यात “स्पोर्टस् सिटी” म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेवटी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा भारताचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर भारताच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.

नव्या पिढीसाठी पर्वणी

पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटबॉलप्रेमी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरणार असून येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. खारघर, नवी मुंबई, पनवेल हे विविध खेळ व त्या खेळांसाठीच्या सोयीसुविधांचे केंद्रबिंदू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ आपल्या महाराष्ट्राचे व भारताचे नाव मोठे करतील, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे या प्रकल्पाचे आभासी उद्घाटन झाले. त्यानंतर या प्रकल्पाच्या निर्मितीबाबतची छोटीशी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी