महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी वाहिली ऋषी कपूर यांना श्रद्धांजली

चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दूवा होते, हा दूवा निखळला आहे, अशी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

cm uddhav thackeray pay homage to veteran actor rishi kapoor
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी वाहिली ऋषी कपूर यांना श्रद्धांजली  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांतील मार्गदर्शक दूवा निखळला, कला क्षेत्राची हानी
  •  भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे.
  • अभिनयातील मानदंड पृथ्वीराज कपूर, द ग्रेट शो-मन राज कपूर यांच्या कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही.

मुंबई :  भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे. ते चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दूवा होते, हा दूवा निखळला आहे, अशी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, अभिनयातील मानदंड पृथ्वीराज कपूर, द ग्रेट शो-मन राज कपूर यांच्या कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही. कुटुंबाचा हा वारसा ऋषी कपूर यांनी समर्थपणे पेलला. निखळ करमणूक आणि चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने नवे प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. चित्रपटसृष्टीचा कलात्मक अंगिकार ते ‘फिल्म इंडस्ट्री’ पर्यंतच्या प्रवासात ते सक्रिय राहीले. ते सहज सूंदर अभिनेता होते, तितकेच ते परखड आणि प्रांजळ व्यक्ति होते. रंगभूमी, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपल्या चिरतरुण व्यक्तिमत्वाप्रमाणे सर्जनशील ठसा उमटविला आहे. चित्रपट सृष्टीतील नव्या पिढीसाठी ते आश्वासक मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने कलाकारांच्या दोन पिढ्यांना जोडणारा दुवा निखळला आहे. भारतीय कला क्षेत्राची हानी झाली आहे. ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’
 

ऋषी कपूर यांच्या निधनाने  चित्रपटसृष्टीतील एक सदाबहार तारा निखळला !: बाळासाहेब थोरात

भारतीय चित्रपटसृष्टीला अमुल्य योगदान दिलेल्या कपूर घराण्याचा समृद्ध वारसा लाभलेला एक सदाबहार तारा आज निखळला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या धक्क्यातून चित्रपटसृष्टी सावरण्याआधीच ऋषी कपूर यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयातून वेगळी छाप सोडली होती. ऋषी कपूर यांनी ७० च्या दशकात बॉबी चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. दामिनी, सरगम, अमर अकबर अँथोनी, कर्ज, अशा जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी दमदार अभिनय साकारला. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर कर्करोगावरावरील उपचार घेऊन भारतात परतले पण काल अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि आज त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कपूर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी