मुख्यमंत्री उद्या जाणार शिवनेरी गडावर, शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा? 

मुंबई
पूजा विचारे
Updated Dec 11, 2019 | 21:53 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावर जाणार आहेत. मुख्यमंत्री यावेळी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्या जाणार शिवनेरी गडावर, शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा?   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावर जाणार आहेत.
  • मुख्यमंत्री यावेळी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
  • या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावर जाणार आहेत. मुख्यमंत्री यावेळी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावरून मुख्यमंत्री सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू शकतात असे संकेत दिलेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. 

याशिवाय उद्धव ठाकरे एकविरा देवीच्या दर्शनलाही जाणार आहेत. त्यानंतर शिवनेरी गडावर जाऊन शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. विधानसभा निकालानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वतः शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेईन. त्यानुसार मुख्यमंत्री हा दौरा करणार आहेत. 

28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे   थोड्याच वेळात  मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवरायांना मानाचा मुजरा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत देणार असल्याचं जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांच्या योजनांची वस्तुस्थिति सादर करण्यास मुख्य सचिवांना निर्देश दिल्याचंही त्यांनी म्हटलंय.  वस्तुस्तिथी सादर होताच शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे शेतकऱ्यांना देणार असल्याचंही ते म्हणाले होते. 

तसंच  रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ६०६ कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार आहे. या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रलंबित होता. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्यासाठी २० कोटी मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच महाराष्ट्राला नंबर १ चं राज्य बनवणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा राज्याचा समृद्ध वारसा असून त्याचे जतन करणे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संवर्धन करणे आवश्यक असून राज्यशासन त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी