मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत दिला 'हा' इशारा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक निर्वाणीचा इशारा दिला.

CM Uddhav Thackeray wish people for Marathi Language Day
मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत दिला 'हा' इशारा 

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत दिला 'हा' इशारा
  • अभिजात भाषेशी संबंधित कायदेशीर बाजू
  • अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे फायदे-तोटे

मुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक निर्वाणीचा इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही? पाहू पुढच्या वर्षीच्या मराठी भाषा दिनापर्यंत महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी ठाकरी शैलीत दिला. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरीव अनुदान मिळू शकते. (CM Uddhav Thackeray wish people for Marathi Language Day)

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता या चार प्रमुख निकषांच्या आधारे केंद्र सरकार एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देते. आतापर्यंत संस्कृत, तामीळ, तेलुगु, कानडी (कन्नड), मल्याळम आणि ओडिआ (उडिया किंवा ओरिया) या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे समितीचा ४३६ पानांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालाचे शास्त्रोक्त विश्लेषण करण्यासाठी केंद्र सरकारने हा अहवाल साहित्य अकादमीकडे पाठवला. साहित्य अकादमीने अहवाल उचित असल्याचे केंद्र सरकारला कळवले. यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. 

केंद्र सरकारच्यावतीने तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सरकारी पातळीवर विचार सुरू आहे, असे एकदा संसदेत मोघम सांगितले होते. पण अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'पाहू पुढच्या वर्षीच्या मराठी भाषा दिनापर्यंत महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही'; अशा शब्दात इशारा दिला आहे. 

अभिजात भाषेशी संबंधित कायदेशीर बाजू

भारतात अभिषात भाषा ठरविण्यासाठी संविधानात कोणतीही तरतूद नव्हती. पण करुणानिधी यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी यूपीए सरकारने २००४ मध्ये तामीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यातून पुढे वाद होऊ नये म्हणून २००५ मध्ये संस्कृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. यानंतर आणखी चार भाषांना अभिजात दर्जा मिळाला. पण अभिजात भाषा प्रकरणातले काही निर्णय न्यायालयात गेले. यामुळे शेवटचे काही निर्णय घेण्यास प्रस्ताव आल्यापासून अनेक महिन्यांचा कालावधी खर्ची पडला. 

मराठी भाषेला २०१५ मध्येच अभिजात भाषेचा दर्जा दिला जाणार होता. पण न्यायालयातील एका प्रकरणामुळे हा विषय रखडला. मद्रास उच्च न्यायालयात असलेली एक याचिका निकाली निघाल्यानंतर केंद्र सरकारच्यावतीने तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाचे संकेत दिले. त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सरकारी पातळीवर विचार सुरू आहे, असे सांगितले. पण या घोषणेला ३ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी पुढे काहीच झालेले नाही. 

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे फायदे-तोटे

अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला भरीव अनुदान मिळू शकते. पण या अनुदानातून मराठी भाषेशी संबंधित ऐतिहासिक बाबींवर आणखी संशोधन करता येईल. मराठी भाषा अधिकाधिक व्यावहारिक होण्यासाठी राबवायच्या उपक्रमांसाठी हे अनुदान वापरता येणार नाही. सध्या मराठी भाषेचा व्यावहारिक सुलभतेसाठी वापर वाढणे आवश्यक आहे. यासाठी डिजिटल क्षेत्रातला मराठी भाषेचा वापर वाढणे, मराठी भाषेत अधिकाधिक शब्दकोष तयार होणे आवश्यक आहे. या कामासाठी केंद्र सरकारच्या अनुदानाचा वापर करता येणार नाही.

मराठी भाषा गौरव दिनाच्या मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा 

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी मराठी, माझी मराठी!' बाणा जपू या! असे आवाहन केले आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही? पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच," या भूमिकेचा देखील मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा शिरवाडकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी