काँग्रेसला रामराम करत हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई
Updated Sep 11, 2019 | 15:51 IST

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करतील.

Harshwardhan patil and cm
काँग्रेसला रामराम करत हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि किरीट सौमय्या यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला.
  • मुंबईतल्या चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पर पडला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरू आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षात मेगाभरती सुरूच आहे.  काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि किरीट सौमय्या यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला.  मुंबईतल्या चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पर पडला. तर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक हे वाशीमध्ये ५५ नगरसेवकांसह नवी मुंबईतील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. 

हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आज मात्र या चर्चांना यानिमित्तानं पूर्णविराम मिळाला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्यानं नाराज पाटील यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर तोफ डागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. त्याचवेळी पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.  पाटील हे सहकार क्षेत्रातील मोठे नेते मानले जातात.

गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश, नवी मुंबई पालिकेवरही फुलणार कमळ 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंजी गणेश नाईक आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये संध्याकाळी ५ वाजता हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपच्या पहिल्या मेगाभरतीत भाजपचा हात धरला. आता गणेश नाईक नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५५ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील. मात्र गणेश नाईक यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांच्या भाजप प्रवेशावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली एकमेव महापालिकेवर सुद्धा कमळ फुलताना दिसेल. प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाईक समर्थकांनी नवी मुंबईत मोठंमोठे बॅनर लावलेत. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...