मुंबईच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मराठी-अमराठी मतांवर डोळा, निरुपम सक्रीय

भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. यानंतर निरुपम यांना अडगळीत टाकले जाणार अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम पुन्हा सक्रीय झाले आहेत.

congress leader sanjay nirupam tweet create new political situation
मुंबईच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मराठी-अमराठी मतांवर डोळा, निरुपम सक्रीय 

थोडं पण कामाचं

  • मुंबईच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मराठी-अमराठी मतांवर डोळा, निरुपम सक्रीय
  • काँग्रेसचा औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, अहमदनगरचे नगर करण्यास विरोध
  • मराठी, दलित बांधव, मुस्लिम बांधव, उत्तर भारतीय यांच्या मतांवर काँग्रेसचा डोळा

मुंबईः भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. यानंतर निरुपम यांना अडगळीत टाकले जाणार अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम पुन्हा सक्रीय झाले आहेत. मुंबई मनपाची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून निरुपम पुन्हा सक्रीय झाले आहेत. काँग्रेसचे मुंबईतील नेते मतभेद बाजूला ठेवून सक्रीय झाल्याचे चित्र आहे. (congress leader sanjay nirupam tweet create new political situation)

मुंबईतील जास्तीत जास्त मराठी आणि अमराठी मते मिळवण्यासाठी भाई जगताप आणि संजय निरुपम ही जोडगोळी सक्रीय झाली आहे. मराठी आणि उत्तर भारतीय मते तसेच दलित बांधवांची आणि मुस्लिम बांधवांची मते यांच्या जोरावर मुंबई मनपाची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस तयारी करत आहे. या तयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्यास तसेच अहमदनगरचे नगर असे नामांतर करण्यास कडाडून विरोध करण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या निमित्ताने काँग्रेस राज्यातील त्यांच्या परंपरागत मतदारांना धर्मनिरपेक्षतेचा संदेश देण्याच्या प्रयत्नात आहे. 

देशात शनिवारी १६ जानेवारी पासून लसीकरण मोहीम सुरू झाली. महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी को-विन अॅपवर माहिती नोंदवण्यात अडचणी येत होत्या. या अडचणी सोडवण्यासाठी तातडीने तंत्रज्ञांची मदत घेण्याऐवजी मुख्यमंत्री तसेच त्यांचे सहकारी असलेले निवडक अन्य मंत्री फोटो काढून घेण्यात मग्न होते. लसीकरण सुरू असताना आपण तिथे उपस्थित होतो हे नागरिकांना सांगण्यासाठी फोटो काढून घेऊन आणि व्हिडीओ तयार करुन घेऊन ते सोशल मीडिया तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याने प्रसिद्ध करण्याला महत्त्व देण्यात आले. लसीकरणाची ऑफलाइन नोंद करण्यात आली. या घटनेवरुन टोमणा मारणारे ट्वीट करत निरुपम यांनी आपण राजकारणात सक्रीय असल्याचे साऱ्यांनाच दाखवून दिले.

महाराष्ट्रात लसीकरणाचे काम थांबवले आहे. तांत्रिक कारणामुळे काम थांबवल्याचे कारण दिले जात आहे. फोटोसाठी मात्र सर्वांमध्ये स्पर्धा दिसत होती. लस कर्मचाऱ्यांनी घेतली पण फोटो मुख्यमंत्री आणि मंत्री यांनी काढले. हे करण्यापेक्षा प्रक्रिया आणि तांत्रिक समस्या यांना प्राधान्य दिले असते तर लसीकरण थांबवावे लागले नसते; अशा स्वरुपाचे मतप्रदर्शन करणारे ट्वीट निरुपम यांनी हिंदी भाषेत केले.

महाराष्ट्रात १७ आणि १८ जानेवारी रोजी लसीकरण होणार नाही. तांत्रिक समस्या दूर करुन ऑफलाइन डेटा को-विन अॅपवर अपडेट करुन नंतर लसीकरण सुरू करण्याचे संकेत सरकारी यंत्रणेने दिले आहेत. या पार्श्वभूममीवर हे ट्वीट आले. ट्वीटद्वारे निरुपम यांनी राजकारणात सक्रीय असल्याचे आणि शिवसेनेवर हल्ला चढवण्याची संधी सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. 

निरुपम यांच्या ट्वीटमुळे काँग्रेस मुंबईत शिवसेनेविरुद्ध स्वतंत्रपणे लढणार याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. कोरोना संकटामुळे रखडलेल्या अनेक निवडणुका पुढील वर्ष-दोन वर्षात होणार आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकमेकांविरोधात कठोर भूमिका घेणार असतील तर राज्याचा कारभार एकदिलाने कसा करणार, या प्रश्नावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी