उद्धव ठाकरेंकडून गोड बातमीचे संकेत...

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 13, 2019 | 15:12 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे नेत्यांसोबत बैठक पार पडली. चर्चा योग्य दिशेनं सुरू असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. लवकरच निर्णय कळेल, असंही ते म्हणाले आहेत.

udhhav thackeray
उद्धव ठाकरेंकडून गोडी बातमीचे संकेत  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे नेत्यांसोबत बैठक पार पडली.
  • चर्चा योग्य दिशेनं सुरू असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
  • लवकरच निर्णय कळेल, असंही ते म्हणाले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे नेत्यांसोबत बैठक पार पडली. चर्चा योग्य दिशेनं सुरू असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. लवकरच निर्णय कळेल, असंही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांसोबत हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक घेतली. जवळपास एक तासभर झालेल्या या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. 

योग्य वेळी निर्णय सर्वांना कळेल, काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा योग्य दिशेनं सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात मंगळवारी राष्ट्रपीत राजवट लागू झाली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत  तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची लीलावती रूग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर हे सर्व नेते थेट हॉटेलच्या दिशेनं रवाना झाले.

 

 

या बैठकीत शेतकरी केंद्रस्थानी ठेवून महाशिवआघाडीची योजना, कर्जमाफी, शेतकऱ्यांना पाणी, २४ तास वीज अजेंड्यावर, किमान समान कार्यक्रम या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 

उद्धव ठाकरेंसोबत केवळ सदिच्छा भेट- बाळासाहेब थोरात 

उद्धव ठाकरे हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली. कालच्या पार्श्वभूमीवर ही केवळ सदिच्छा भेट होती असं म्हणत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आधी एकत्र बैठक करू असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे. बैठकीत जे ठरेल त्यानंतर शिवसेनेशी चर्चा करू तसंच कॉमन अजेंडा काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत ठरवण्यात येईल आणि आवश्यक असल्यास शिवसेनेशी चर्चा करू, असंही थोरात यांनी म्हटलंय. आम्ही भेटतो तेच सकारात्मक चर्चा असल्याचंही ते म्हणाले. किमान समान कार्यक्रमाबाबत आधी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत चर्चा होईल. तसंच उद्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 

किमान समान कार्यक्रमासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची समिती स्थापन

राष्ट्रवादी कॉंग्रेसनं काँग्रेससोबत किमान समान कार्यक्रमाच्या चर्चेसाठी महाराष्ट्र नेत्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे. कॉंग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत किमान समान कार्यक्रमाच्या चर्चेसाठी महाराष्ट्र नेत्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी