सत्ता संघर्ष सुरु असताना काँग्रेसने घेतला मोठा निर्णय 

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 08, 2019 | 00:09 IST

Congress MLAs: राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेवर कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यातच आता काँग्रेस पक्षाने एक मोठा निर्णय घेतला असल्याचं वृत्त समोर येत आहे. 

congress party mla jaipur rajasthan bjp shiv sena government formation vidhan sabha election result 2019
सत्ता संघर्ष सुरु असताना काँग्रेसने घेतला मोठा निर्णय   |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • काँग्रेस पक्षाने घेतला मोठा निर्णय 
  • काँग्रेस पक्षाने सर्व आमदारांना जयपूरला पाठवण्याची केली तयारी
  • आमदारांना आमिष दाखवून फोडलं जाण्याच्या भीतीने निर्णय घेतल्याची माहिती

मुंबई: विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १०५ जागांवर विजय मिळवला. मात्र, महायुतीमधील शिवसेना सत्तेत समसमान वाटपासाठी आग्रही असल्याने सत्तेचा पेच अध्यापही कायम आहे. त्यामुळे दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच राजकीच पक्षांनी घबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व आमदारांना राजस्थानमधील जयपूर येथे पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

... म्हणून घेतला निर्णय

भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करायची असल्यास बहुमतासाठी आणखी आमदार कमी पडत आहेत. यासाठी भाजप आपल्या आमदारांना आमिष, प्रलोभनं दाखवून फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्वच्या सर्व आमदारांना जयपूर येथे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

का निवडले जयपूर?...

राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे त्यामुळे जयपूर हे ठिकाण आपल्या आमदारांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचं लक्षात घेत काँग्रेसने सर्व आमदारांना जयपूर येथे पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. कर्नाटकात राजकीय पेच निर्माण झाला होता त्यावेळी कर्नाटकातील आमदार हे महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्याने त्यांना मुंबई सुरक्षित वाटत होती आणि त्याच प्रमाणे आता काँग्रेसने आपल्या आमदारांसाठी जयपूर निवडल्याची चर्चा आहे.

राज्यात शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम आहे तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याने दोघांतील सत्ता संघर्ष सुरुच आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांची एक बैठक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडली. जे ठरलं आहे तेच द्यावं अशी भूमिका बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडली. तर तिकडे भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. मात्र, बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा भाजपने केलेला नाहीये. ८ नोव्हेंबर रोजी १३व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे त्यामुळे शुक्रवारी देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी