मोठी घडामोड: काँग्रेस ठाकरे सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या तयारीत? शिवसेनेसमोर मोठा पेच 

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 11, 2019 | 13:04 IST

Congress: राज्यात सत्ता स्थापन झालेली असली तरी खाते वाटप झालेलं नाही. याच मुद्द्यावरुन आता काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

congress ready to give outside support to thackeray government big screw in front of shiv sena
मोठी घडामोड: काँग्रेस ठाकरे सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याच्या तयारीत, शिवसेनेसमोर मोठा पेच   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • खाते वाटपावरुन तीनही पक्षांमध्ये अद्यापही रस्सीखेच
  • खाते वाटपाबाबत काँग्रेस प्रचंड नाराज
  • काँग्रेसचा सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा

मुंबई: राज्यात प्रचंड मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्यानंतर नवं सरकार स्थापन झालं. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला होता. आता नवं सरकार लवकरच राज्यातील प्रश्न मार्गी लावेल असंच सगळ्यांना त्यावेळी वाटलं होतं. पण अद्यापही नव्या सरकारमधील तीन पक्षांमध्ये खाते वाटपावरुन एकमत होत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसने थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. पण, त्यामुळे या नव्या सरकारला लागलीच धोका निर्माण होईल असं अजिबात नाही. कारण की, यावेळी काँग्रेस सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार असल्याचंही समजतं आहे. 

राज्यात सत्ता स्थापन होऊन अवघे १२ ते १३ दिवसच झालेले असताना आता काँग्रेसने अशी भूमिका घेतल्यास सरकारला मोठा धक्का बसू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांच्या शपथविधीला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही खातेवाटप झालेलं नाही. त्यातच अद्यापही तीन महत्त्वाच्या खात्यावरुन कोणताही निर्णय झालेला नाही. नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंधारण या तीन खात्यावरुन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. या खात्यांसाठी तीनही पक्ष आग्रही असल्याने आता काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तीन खात्यांबाबतचा तिढा न सुटल्याने काँग्रेसने सरकारला थेट बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा दिला असल्याचं समजतं आहे. याबाबतचं वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिलं आहे. 

नगरविकास खात्यासाठी शिवसेना सध्या प्रचंड आग्रही आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला देखील हे महत्त्वाचं खातं हवं आहे. पण याबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे गृह आणि उद्योग ही महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. तर काँग्रेसला महसूल आणि उर्जा ही खाती मिळणार आहे. तर राष्ट्रवादीला अर्थ आणि कृषी ही महत्त्वाची मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. पण आता फक्त तीन खात्यांवरुन या तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही तासात खाते वाटपाची घोषणा होण्याची शक्यता होती. पण आता काँग्रेसने अतिशय टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता आता शिवसेना काँग्रेससाठी नेमकी कोणती-कोणती खाती सोडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्यावरच या सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 

दरम्यान, या सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला फार काहीही येत नसल्याचं वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस नेत्यांची समजूत कशी काढणार यावर पुढची सर्व गणितं अवलंबून असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी