कोरोनाच्या संकटप्रसंगी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा मदतीचा हात

मुंबई
Updated Mar 27, 2020 | 07:56 IST

शिवसेना आपल्या सर्व आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. सुभाष देसाई यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहीती दिली.

Uddhav thackeray and sharad pawar
आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्यातच केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर प्रयत्न करताहेत. तसंच या संकटाचा सामना करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण येतोय. याच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एक मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना आपल्या सर्व आमदार आणि खासदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. तर राष्ट्रवादीदेखील आपल्या सर्व आमदारांच्या एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री निधी तर खासदारांच्या एका महिन्याचं वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. 

या संकटाच्या परिस्थितीत राज्य सरकारसोबत काम करण्यासाठी शिवेसनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार, लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

सुभाष देसाई यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहीती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, कोरोना संसर्गावर मात करण्यास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शर्थीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे विधानसभा, विधान परिषदेचे सर्व आमदार आणि लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहेत.

पुढे सुभाष देसाई म्हणाले की,  कोरोनाच्या संकटात मात करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सुनियोजित पद्धतीने उपाययोजना करत आहे. तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री राज्यातील जनतेला सर्वोतोपरीने सहाय्य करीत आहेत. या लढाईत आपला देखील खारीचा वाटा असावा म्हणून शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.

तसंच  राज्यातील शेतकरी, कामगार, मजूर, आणि गोरगरीब जनतेला या निधीचा निश्चित फायदा होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडे संबंधितांनी धनादेश जमा करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील अशाच प्रकारची माहिती ट्विटरवर दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तर खासदार प्रधानमंत्री सहाय्यता निधीत आपल्या एक महिन्याचं वेतन देणार, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.

या संदर्भात काढलेल्या अधिकृत पत्रकात शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य आणि केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळ सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आणि संसदेतील सदस्यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...