‘कोस्टल रोड’ बोगद्याचे १०० मीटरचे खोदकाम पूर्ण

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ व वेगवान करण्यासह प्रदूषण नियंत्रणास हातभार लावणा-या ‘सागरी किनारा मार्ग’ या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

costal road first tunnel completed
‘कोस्टल रोड’ बोगद्याचे १०० मीटरचे खोदकाम पूर्ण  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • 'मावळा' संयंत्राद्वारे अव्याहतपणे करण्यात येत आहे बोगद्याचे खोदकाम
 • जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर खोलीवर बांधण्यात येत आहेत महाबोगदे
 • बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे उभारण्याचे काम देखील वेगात सुरु आहे.

मुंबई : ‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ असे घोषवाक्य असणारा आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ व वेगवान करण्यासह प्रदूषण नियंत्रणास हातभार लावणा-या ‘सागरी किनारा मार्ग’ या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणा-या महाबोगद्याचे खोदकाम ‘मावळा’ या अवाढव्य संयंत्राद्वारे अव्याहतपणे करण्यात येत असून आता बोगद्याचे १०० मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. हे लक्षात घेता बोगद्यांच्या खोदकामाची शतकपूर्ती एका वेगळ्या अर्थाने झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे उभारण्याचे काम देखील वेगात सुरु आहे. यानुसार सदर १०० मीटरच्या खोदकामा दरम्यान मावळा संयंत्राच्याच मदतीने तब्बल ४७ कंकणाकृती कडा देखील उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरुपातील ७ कंकणाकृती कडांचीही उभारणी मावळ्याच्या मदतीने करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी दिली आहे.
..

सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याच्या कार्याचा व यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'मावळा' हे संयंत्र कार्यान्वित करण्याचा शुभारंभ महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ११ जानेवारी, २०२१ रोजी करण्यात आला होता. तेव्हापासून सदर बोगदे खणण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे. बोगदे खणण्याच्या कामाचे १०० मीटरचे अंतर पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सागरी किनारा रस्त्याच्या प्रमुख अभियंता श्रीमती सुप्रभा मराठे यांनी सागरी किनारा मार्गाबद्दल दिलेली महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे :

 1. सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या 'छोटा चौपाटी'पर्यंत असणार असून ते 'मलबार हिल' च्या खालून जाणार आहेत. सदर दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.
 2. हे बोगदे खणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे 'टनेल बोरिंग मशीन' वापरण्यात येणार असून या संयंत्राचे 'मावळा' असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र ४ मजली इमारती एवढे उंच असून त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे.
 3. 'मावळा' या संयंत्राची पाती ही प्रत्येक मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत (2.6 RPM).  'मावळा' या संयंत्राचे प्रत्यक्ष प्रचलन हे संगणकीय पद्धतीने होत आहे. तर 'मावळा' या संयंत्राची उर्जा क्षमता ही ७,२८० किलोवॅट एवढी असून प्रकल्प कालावधी दरम्यान दररोज़ सरासरी ८ मीटर बोगदा खणला ज़ाईल, अशी अपेक्षा आहे.
 4. 'मावळा' या संयंत्राचे (Tunnel Boaring Machine) वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी बोगदा खणावयाचा आहे, त्या ठिकाणी प्रथम 'बेंटोनाईट' (Bentonite) मिश्रित पाण्याचा अत्यंत वेगवान फवारा मारला जाईल. त्यानंतर 'मावळा' या संयंत्राच्या १२.१९ मीटर व्यास असणाऱ्या चकती प्रकारच्या पात्याद्वारे बोगदा खणला जाईल. बोगदा खणल्यामुळे निघणारी माती, खडी इत्यादी ही आधी फवारलेल्या पाण्यामध्ये एकत्र होऊन खडी व माती मिश्रित पाणी (Slurry) तयार होईल. हे पाणी 'मावळा' या संयंत्राद्वारे खेचून बाहेर टाकले जाईल. हे पाणी बाहेर काढण्यासाठी या संयंत्रामध्ये स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आहे.
 5. दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर एवढी असणार आहे. तसेच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर असणार आहे. या बोगद्यांना वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तर (Concrete Lining) असणार असून ज्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे.
 6. वरील नुसार दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील महाबोगद्यांचा भाग असणार आहेत.
 7. वरील तपशिलानुसार दोन्ही महाबोगदे खणण्यासाठी प्रत्येकी साधारणपणे ९ महिने लागणार असून दोन्ही बोगद्यांसाठी २ महिन्याचा अतिरिक्त कालावधी ज़मेस धरण्यात आला आहे. यानुसार महाबोगदे खणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
 8. मावळा या संयंत्राद्वारे बाहेर टाकण्यात येणा-या पाण्याचा पुनर्वापर करता यावा, यासाठी 'प्रक्रिया केंद्र' (Treatment Plant) देखील प्रकल्पाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तर खोदकामातून निघणारे खडक व खडी याचा उपयोग भराव कामात (Reclamation Work) करण्यात येत आहे.
 9. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (Princess street flyover) ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा असणारा 'सागरी किनारा मार्ग' बांधल्यामुळे प्रवासाच्या वेळेत ७० टक्‍क्‍यांची बचत होण्यासोबतच ३० टक्के इंधन बचत देखील साध्य होणार आहे. यामुळे अर्थातच पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी