दिवाळीनंतर कोरोना निर्बंध शिथील होणार, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 17, 2021 | 20:00 IST

महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोना निर्बंध शिथील होऊ शकतात, असे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

Covid19 restrictions will be relaxed in maharashtra after Diwali says health minister rajesh tope
दिवाळीनंतर कोरोना निर्बंध शिथील होणार, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत 
थोडं पण कामाचं
  • दिवाळीनंतर कोरोना निर्बंध शिथील होणार, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत
  • महाराष्ट्र शासन दिवाळीनंतर कोरोना प्रतिबंधक लसचा एक डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देऊ शकते
  • रेल्वे प्रवासाची सशर्त परवानगी

मुंबईः महाराष्ट्रात दिवाळीनंतर कोरोना निर्बंध शिथील होऊ शकतात, असे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. दिवाळीनंतर राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. परिस्थिती नियंत्रणात असेल आणि कोरोना संकटाची तीव्रता कमी होत असेल तर निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होऊ शकतो, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

सध्या कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीला रेल्वेतून प्रवास करता येतो. पण लसचा एकही डोस घेतला नसला तरी दुचाकी, रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर सारख्या कॅब, खासगी वाहन, बस यामधून प्रवास करता येतो. कोरोना संकट नियंत्रणात असेल तर महाराष्ट्र शासन दिवाळीनंतर कोरोना प्रतिबंधक लसचा एक डोस घेतलेल्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देऊ शकते; असे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस घेतला आहे आणि ज्यांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप अॅक्टिव्ह आहे आणि त्यात मोबाइलधारक 'सेफ' (सुरक्षित) असल्याचे दिसत आहे त्यांना महाराष्ट्र शासन दिवाळीनंतर रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देऊ शकते. या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होईल; असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार निर्बंध शिथील झाले तर कामाच्या निमित्ताने दररोज रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळेल. राज्यातील बहुसंख्य नागरिक प्रवासाकरिता रस्ते मार्गाचा वापर करत आहेत. खासगी किंवा सार्वजनिक वाहनातून प्रवास करत आहेत. वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास अनेकदा वेळखाऊ आणि खर्चिक होत आहे. या तुलनेत रेल्वेतून होणारा प्रवास वेळ आणि पैशांची बचत करेल. 

कोरोना संकटामुळे लोकलमधून प्रवास करण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याचा अधिकार केंद्राने तात्पुरता राज्यांना दिला आहे. या अधिकाराचा वापर करत महाराष्ट्र शासन रेल्वे प्रवासाचे निर्बंध दिवाळीनंतर शिथील करण्याची शक्यता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी