Crippled leopard will live in National Park of Borivali : मुंबई : जंगलात बिनधास्त वावरणारा बिबळ्या अपंग झाल्यामुळे आता कायमचा बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये राहणार आहे. या बिबळ्याला आयुष्यभर लोखंडी पिंजऱ्याआड जगावे लागणार आहे.
जंगलातून शेतात शिरणारी रानडुक्कर नासाडी करतात. ही नासाडी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतांजवळच्या जंगल भागात सापळे लावले आहेत. शिकारीसाठी पळताना बिबळ्याचा पाय सापळ्यात अडकला. सुटका करुन घेण्यासाठी बिबळ्याने सर्व शक्ती पणाला लावली. यामुळे सापळ्यात अडकलेला पाय सोडविणे त्याला शक्य झाले पण पायाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. या दुखापतीमुळे बिबळ्या लंगडू लागला. लंगडत लंगडत बिबळ्या विरारच्या काशीद कोपर गावाजवळ वावरत होता. गावकऱ्यांनी बिबळ्या आढळल्याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाने या जखमी बिबळ्याला पकडले. बिबळ्याची अवस्था बघून त्याला तातडीने मुंबईला आणण्यात आले.
जखमी बिळ्यावर मुंबईत प्राण्यांच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. पायाला झालेल्या जखमेमुळे रक्तपुरवठ्यावर परिणाम झाला होता. पायाच्या भागात गँगरिन झाले असते तर बिबळ्याच्या जीवावर बेतले असते. हे संकट टाळण्यासाठी बिबळ्याचा पाय कापण्यात आला. कापलेल्या पायाच्या ठिकाणी झालेल्या जखमेवर दोन आठवडे दररोज ड्रेसिंग केले जाईल. जखमी बरी होईल पण अपंग बिबळ्या कधीही शिकार करण्यासाठी धावू शकणार नाही. याच कारणामुळे वन विभागाने बिबळ्याला कायमचे नॅशनल पार्कमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.