ठाणे: राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री(Actress) केतकी चितळे (Ketki Chitale) हिला १८ मे पर्यंत पोलीस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस कोठडीतील चौकशीत काय समोर येणार, हे पाहावे लागेल. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात (Sessions Court) हजर करण्यात आले होते. केतकी चितळे हिने कोणताही वकील घेतला नव्हता. तिने न्यायालयात स्वत:च युक्तिवाद केला. यावेळी तिने आपण राजकीय व्यक्ती नसल्याचे सांगितले. मला समाज माध्यमांवर माझे स्वत:चे मत मांडायचा अधिकार नाही का, असा सवालही तिने विचारला. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. यानंतर केतकी चितळेचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. केतकीवर आतापर्यंत 9 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव येथे केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
ठाणे सत्र न्यायालयाबाहेरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतकी चितळे हिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता आम्ही केतकी चितळेला महाराष्ट्र दर्शन घडवू, असा इशाराही दिला. केतकी चितळे हिच्यावर इतर शहरांमधील गुन्ह्यांप्रकरणीही कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. काल नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना केतकीच्या अंगावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंडी आणि शाईफेक केली होती. आजही राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून केतकीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
सुनावणीदरम्यान केतकीने वकील घेतला नाही, तिने स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी बोलताना ती म्हणाली की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल केतकी चितळेने उपस्थित केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, अशी ठाम भूमिकाही केतकीने घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 18 मे रोजी होईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.