Cruise Drugs Case: आर्यनने गुन्हेगारी कट रचल्याचा पुरावा नाही!; अन् व्हॉट्सअॅप संदेशही क्लिन- उच्च न्यायालय

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 21, 2021 | 10:17 IST

Cruise Drugs Case: क्रूझवरील (Cruise ) अमली (Drugs ) पदार्थ प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे सर्वांसमोर आले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवलेल्या एक मतामुळे ड्रग्ज प्रकरणाची पोलखोल झाली आहे.

No evidence of Aryan conspiracy High Court
आर्यनने गुन्हेगारी कट रचल्याचा पुरावा नाही- उच्च न्यायालय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आर्यन खानने ड्रग्ज घेतले का नाही याची खात्री करण्यासाठी एनसीबीने वैद्यकीय तपासणी केली नाही.
  • क्रूझवरून प्रवास करणे याचा अर्थ कट रचणे असा होत नाही. - उच्च न्यायालय

Cruise Drugs Case: मुंबई : क्रूझवरील (Cruise ) अमली (Drugs ) पदार्थ प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे सर्वांसमोर आले आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवलेल्या एक मतामुळे ड्रग्ज प्रकरणाची पोलखोल झाली आहे. क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा (Actor Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan), त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Drug Prevention Act) फौजदारी षड्यंत्र (Criminal conspiracy) रचल्याचा कुठलाही सकारात्मक पुरावा दिसत नसल्याचे मत उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर करताना नोंदवले आहे.

आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशात काहीच आक्षेपार्ह नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. आर्यन आणि अन्य दोघांना न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी १४ अटी घालून २९ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आर्यनची आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली होती. आर्यन आणि अन्य दोन आरोपींना जामीन मंजूर करण्याच्या न्यायमूर्ती सांब्रे यांच्या तपशीलवार आदेशाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. षड्यंत्र रचल्याच्या मुद्द्याबाबत आर्यन आणि अन्य दोन आरोपींविरोधात केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) जे पुरावे सादर केले, त्यावरून या तिघांविरोधात षड्यंत्र रचल्याचा कुठलाही सकारात्मक पुरावा सकृद्दर्शनी दिसत नाही.

उलट आतापर्यंतच्या तपासातून आर्यन आणि अरबाज मर्चंट यांनी मुनमुन धमेचाबरोबर नव्हे, तर स्वतंत्रपणे प्रवास केल्याचे तसेच त्यांची तिच्याशी भेट झाली नसल्याचे पुढे आल्याचे न्यायमूर्ती सांब्रे यांनी आपल्या १४ पानी आदेशात म्हटले आहे.  या आरोपींनी षड्यंत्राचा भाग म्हणून व्यावसायिक प्रमाणात अमली पदार्थ बाळगून अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हेतुत: गुन्हा केल्याचे मानले जावे हे ‘एनसीबी’चे म्हणणे मान्य करण्यासही न्यायालयाने नकार देत एनसीबीला धक्का दिला आहे.तिन्ही आरोपींनी आधीच जवळपास २५ दिवस तुरुंगवास भोगला आहे आणि त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही हे ठरवण्यासाठी ‘एनसीबी’ने त्यांची वैद्यकीय तपासणीदेखील केली नव्हती, यावर न्यायालयाने बोट ठेवले आहे.

न्यायालयाने काय म्हटलं 

आर्यनकडे कोणतेही अमली पदार्थ सापडलेले नाही याबाबत दुमत नाही. शिवाय अरबाज आणि धमेचा यांच्याकडे अमली पदार्थांचा बेकायदा साठा आढळला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प होते. अशा वेळी तिन्ही आरोपींनी षड्यंत्र रचल्याचा सकृद्दर्शनी पुरेसा पुरावा आहे का? आणि एनसीबी त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप ठेवू शकते का, हे तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी बेकायदा कृत्य केल्याचा पुरावा आहे का हे पाहावे लागते. त्याचा विचार करता आरोपी केवळ क्रूझवरून प्रवास करत होते याचा अर्थ त्यांनी बेकायदा गुन्हा करण्याच्या हेतूने कट रचला, असा होत नाही. तसेच एनसीबीचे म्हणणे मान्य केले तरी त्यासाठी आरोपींना एक वर्षाहून अधिक काळासाठी शिक्षा होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी