CRZ permits additional construction at beach bungalows of Sachin Tendulkar, Amitabh Bachchan : भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि पद्मविभूषण अमिताभ बच्चन या दिग्गजांच्या समुद्रकिनाऱ्यावरील बंगल्यांच्या अतिरिक्त बांधकामाला सागरी नियमन क्षेत्र कायद्यातंर्गत (Coastal Regulation Zone : CRZ) परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी मिळाल्यामुळे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांना त्यांच्या बंगल्यांचे अतिरिक्त बांधकाम करता येईल. या बांधकामाला आता सीआरझेड अंतर्गत कोणतीही आडकाठी येणार नाही.
मुंबईतील कार्टर रोड परिसरात समुद्राला लागून सचिन तेंडुलकरचा बंगला आहे. या बंगल्याच्या बांधकामाचे स्वरुप सध्या अप्पर बेसमेंट, लोअर बेसमेंट, तळमजला (ग्राउंड फ्लोअर) प्लस तीन मजले असे आहे. बंगल्याच्या बांधकामाला 2011 मध्ये मंजुरी मिळाली. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे फक्त 1 फ्लोअर स्पेस इंडेक्स अर्थात 1 एफएसआय या बंगल्याला मिळाला होता. याच कारणामुळे सचिनकडून अतिरिक्त बांधकामाकरिता अर्ज करण्यात आला होता. या अर्जाला मंजुरी मिळाली आहे. चौथ्या मजल्यावर बांधकाम करणे आणि गच्ची (टेरेस) स्वरुपात पाचवा मजला उभारणे ही कामं करणे शक्य होणार आहे.
बच्चन कुटुंबानेही त्यांच्या जुहू येथील कपोल सोसायटीतल्या जलसा बंगल्याच्या अतिरिक्त बांधकामासाठी परवानगी मागितली होती. सध्या या बंगल्याचे स्वरुप बेसमेंट, ग्राऊंड प्लस वरती 2 मजले असे आहे. बंगल्याच्या बांधकामाला 1984 मध्ये परवानगी मिळाली होती. या बंगल्यातील अतिरिक्त बांधकामासाठी बच्चन कुटुंबाने अर्ज केला होता. या अर्जाला मंजुरी मिळाल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर आणखी बांधकाम करता येईल. तसेच राहण्यासाठी अतिरिक्त मजल्याचे काम पण करता येईल. निकषात बसत असल्यामुळे या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे.
गौतम अदानी यांचे व्याही असलेल्या सिरिल श्रॉफ यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामासही मंजुरी देण्यात आली आहे.
सीआरझेड कायद्याचे पालन करत तिन्ही बंगल्यांच्या वाढीव बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. हे बांधकाम करताना तयार होणारा राडारोडा आणि कचरा सीआरझेड क्षेत्रात टाकता येणार नाही, अशी अट तिन्ही बंगल्यांचे अर्ज मंजूर करताना घालण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.