चक्रीवादळ जवळ येताच 'या' ठिकाणी कलम १४४ लागू

मुंबई
Updated Jun 02, 2020 | 22:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

निसर्ग चक्रीवादळ कोकणच्या किनारपट्टीजवळ येऊ लागले आहे. पावसाला सुरुवात होताच महाराष्ट्र शासनाने राज्याच्या निवडक भागांमध्ये कलम १४४ लागू केले आहे. 

cyclone nisarga, ndrf
मुंबई 

थोडं पण कामाचं

 • चक्रीवादळ जवळ येताच राज्याच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये कलम १४४ लागू
 • महाराष्ट्रात मदतीसाठी मोठी टीम, एनडीआरएफच्या १५ टीम सज्ज
 • चक्रीवादळात काय करावे, काय करू नये याचे प्रशासनाकडून मार्गदर्शन

मुंबईः निसर्ग चक्रीवादळ कोकणच्या किनारपट्टीजवळ येऊ लागले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात होताच महाराष्ट्र शासनाने राज्याच्या निवडक भागांमध्ये कलम १४४ लागू केले आहे. 

किनारपट्टीजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शासनाने किनारपट्टीच्या परिसरात कलम १४४ द्वारे जमावबंदी लागू केली आहे. समुद्रात मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मच्छीमार बांधवांना समुद्रातून माघारी बोलावण्यात आले आहेत. मच्छीमार बांधवांच्या बोटी समुद्र किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आल्या आहेत. बोटींचे नुकसान टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेतली जात आहे. चक्रीवादळामुळे ताशी १०५ ते १२५ किमी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. 

चक्रीवादळाची धडक

चक्रीवादळ प्रमुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना धडक देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर या भागाला चक्रीवादळाची पहिली धडक बसण्याची शक्यता आहे.

सुरक्षित स्थलांतर

किनारपट्टीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे तसेच कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी चक्रीवादळामुळे रुग्णांना त्रास होईल अशी शक्यता वाटत आहे, अशा भागातील रुग्णांचे सुरक्षित ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. सखल भागांमधील नागरिकांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.

पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या संकटात केंद्र सरकार राज्याच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

मदतीसाठी मोठी टीम

चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) १५ आणि एसडीआरएफच्या (राज्य आपत्ती निवारण दल) ४ टीम महाराष्ट्रात नियुक्त करण्यात आल्या आहेत. आणखी ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मंत्रालयात २४ तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष काम करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सैन्याची तिन्ही दले, तटरक्षक दल, एनडीआरएफ, अग्नीशमन दल, स्थानिक प्रशासन, स्थानिक सरकारी आरोग्य विभाग आणि पोलीस परस्पर समन्वय राखून काम करत आहेत. 

चक्रीवादळात हे करा

 1. सैल वस्तू बांधून ठेवा
 2. महत्त्वाची कागदपत्रे, दागिने, ऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत सील करा
 3. मोबाईल आणि बॅटरीवर चालणारी उपकरणे चार्ज करा
 4. दूरदर्शन, आकाशवाणीच्या सूचनांवर लक्ष ठेवा
 5. पक्के बांधकाम असलेल्या, पाण्याची गळती होत नसलेल्या सुरक्षित ठिकाणी मुक्काम ठेवा
 6. आपत्कालीन वस्तू आणि प्रथमोपचाराची पेटी तयार ठेवा
 7. खिडक्यांपासून दूर राहा, खोलीच्या मध्यभागी राहा
 8. वादळी वारे वाहू लागल्यास जड टेबल किंवा जड खाटेच्या खाली सुरक्षित राहा
 9. डोकं, मानेचं हातांनी रक्षण करा
 10. घरात जाणे शक्य नसल्यास जवळच्या छोट्या खड्ड्यात किंवा चरामध्ये जमिनीलगत पडून राहा
 11. सोबत पिण्यायोग्य पाणी आणि कोरडे खाण्याचे पदार्थ ठेवा
 12. तेल, रसायन, औषध, वायू (गॅस) यांची गळती होणार नाही यासाठी खबरदारी घ्या

चक्रीवादळात हे टाळा

 1. विजेच्या तारा, झाड, दिव्याचे खांब, विजेची उपकरणे, पाणी गळतीमुळे ओली झालेली भिंत यांना स्पर्श करणे टाळा
 2. झाडाखाली किंवा दिव्याच्या खांबाजवळ अथवा विजेच्या तारांखाली उभे राहणे टाळा
 3. विजेची उपकरणे वापरणे टाळा
 4. कच्चे बांधकाम, पडझड झालेले बांधकाम अशा ठिकाणी किंवा त्यांच्या आसपास थांबणे टाळा
 5. अनुभवी बचाव पथकाच्या सूचनेशिवाय मदतकार्य करण्याची घाई करू नका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी