मुंबईला चक्रीवादळाचा धोका, १५ ऑक्टोबरला बसेल तडाखा; तेलंगणात पाऊस

cyclone warning for mumbai बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेश ते मुंबई व्हाया अहमदनगरचे कर्जत जामखेड असा प्रवास करुन अरबी समुद्रात जाईल

cyclone warning for mumbai
मुंबईला चक्रीवादळाचा धोका, १५ ऑक्टोबरला बसेल तडाखा; तेलंगणात पाऊस 

थोडं पण कामाचं

  • मुंबईला चक्रीवादळाचा धोका, १५ ऑक्टोबरला बसेल तडाखा
  • चक्रीवादळ मुंबईत गुरुवारी १५ ऑक्टोबरच्या दुपारी धडकण्याची शक्यता
  • महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १८ ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता

मुंबईः बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेश ते मुंबई व्हाया अहमदनगरचे कर्जत जामखेड असा प्रवास करुन अरबी समुद्रात जाईल आणि पुढे कराचीकडे सरकेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी १५ ऑक्टोबरच्या दुपारी मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. एका समुद्रातून निघालेले वादळ दुसऱ्या समुद्रापर्यंत जाण्याची घटना दुर्मिळ आहे. (cyclone warning for mumbai)

उत्तर भारतातून निघालेले परतीच्या पावसाचे थंड वारे महाराष्ट्रात

वादळाचा धोका घोंगावत असताना उत्तर भारतातून निघालेले परतीच्या पावसाचे थंड वारे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. सध्या राज्यात बाष्पयुक्त हवेत थंड वारे मिसळल्यामुळे दमटपणा वाढला आहे. चक्रीवादळाच्या प्रवासाची दिशा बघता पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीसह मुंबई महानगर प्रदेशात बुधवारी आणि गुरुवारी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल अनाकलनीय असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. 

तेलंगणमधील पावसाने दिला इशारा

तेलंगणमध्ये १३-१४ ऑक्टोबर दरम्यान पावसाने दणका देत चक्रीवादळाचा प्रवास सुरू असल्याचा पहिला स्पष्ट इशारा दिला, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. इथून पुढे घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

चक्रीवादळाचा दुर्मिळ प्रवास

हवामान विभागाकडे मागील १०० वर्षांच्या हवामानाशी संबंधित नोंदी आहेत. यात बंगालच्या उपसागरातून निघालेले वादळ जमिनीवरुन प्रवास करत अरबी समुद्रात पोहोचल्याची तसेच याच काळात उत्तरेतून आलेल्या परतीच्या पावसाच्या थंड वाऱ्यामुळे दमट वातावरण निर्माण होणे आणि पाऊस पडणे अशा घटनांची नोंद दिसत नाही. 

चक्रीवादळ मुंबईत गुरुवारी १५ ऑक्टोबरच्या दुपारी धडकण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेशमधून पुढे सरकेल. नांदेडमार्गे गुरुवारी पहाटे हे वादळ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड आणि तिथून पुढे मुंबईत दाखल होईल. चक्रीवादळ मुंबईत गुरुवारी १५ ऑक्टोबरच्या दुपारी धडकण्याची शक्यता आहे. वादळ ज्या भागातून जाईल त्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १८ ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता

चक्रीवादळ ताशी २५ किलोमीटर या चक्राकार वेगाने तसेच ताशी १० ते १५ किलोमीटर या वेगाने सरळ रेषेत पुढे सरकेल. अरबी समुद्रात वादळाचा वेग वाढेल आणि तिथून ते पाकिस्तानमधील कराचीच्या दिशेने वेगाने प्रवास करेल. वादळाच्या प्रवासाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १८ ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीसह मुंबई महानगर प्रदेश आहे. 

राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेला सज्जतेचा आदेश

अरबी समुद्रात वादळांची निर्मिती झाली तरी चक्रीवादळ तयार झाल्याच्या घटना कमी आहेत. ज्यावेळी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले त्यावेळी या चक्रीवादळाने त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रदेशात मोठे नुकसान केले. कोकणात धडकलेले निसर्ग चक्रीवादळ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे कोकणचे प्रचंड नुकसान झाले. पाठोपाठ आता बंगालच्या उपसागरातून निघालेले चक्रीवादळ महाराष्ट्रातून प्रवास करत अरबी समुद्रात जाणार आहे. या वादळामुळे किती हानी होईल याचा अंदाज बांधून केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेला सज्जतेचा आदेश दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी