Happy Birthday: राजकारणातील दादा...अजित पवारांविषयीच्या इंटरेस्टिंग गोष्टी

मुंबई
Updated Jul 22, 2020 | 07:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Happy Birthday ajit pawar: राजकारणातील करारी व्यक्तीमत्व अशी ओळख असलेले अजित पवार यांचा २२ जुलैला वाढदिवस असून ते वयाची ६० वर्ष पूर्ण करत आहेत.  

ajit pawar
Happy Birthday: राजकारणातील दादा...अजित पवार   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात एंट्री
  • अजित पवार यांची पुढी पिढी राजकारणात
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज (२२ जुलै २०२०) वाढदिवस (Birthday). अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नाव. त्यांचा दरारा नेहमीच असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते (ncp leader) म्हणजे अजित पवार. २२ जुलै १९५९ला अजित पवार यांचा जन्म झाला. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे. राजकारणात काका-पुतण्याची ही जोडी खूप प्रसिद्ध आहे. २०१९मधील निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. यातच अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उपमुख्यमंत्री पद असण्यासोबतच अजित पवार हे अर्थमंत्री देखील आहेत. 

अशी झाली राजकारणात एंट्री

जेव्हा अजित पवार शिक्षण घेत होते तेव्हा शरद पवार यांच्याकडे राजकारणातील उगवता तारा म्हणून पाहिले जात होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अजित पवार मुंबईला आले. १९८२मध्ये अजित पवार यांनी खऱ्या अर्थाने राजकारणात एंट्री घेतली ती म्हणजे साखर सहकारी कारखान्याच्या मंडळात निवडून येत. त्यानंतर पुणे जिल्हा को-ऑप बँकेच्या चेअरमनपदी ते तब्बल १६ वर्षे होते. या दरम्यान ते लोकसभेतूनही बारामती येथून निवडून आले. मात्र त्यांनी ही जागा शरद पवार यांच्यासाठी सोडली.

प्रशासनाचा दांडगा अनुभव 

काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभेची जागा सोडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून विधानसभेवर आमदारकी मिळवली. १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४मध्ये पवार आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आले. सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ते शेती आणि उर्जामंत्रीही होते. 

त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. त्यानंतर दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारमध्येही अजित पवार यांनी विविध मंत्रीपदे भूषवले. २००४मध्ये ते पुण्याचे पालकमंत्री होते. 

२०१९ ची विधानसभा निवडणूक आणि अजित पवार

२०१९ची विधानसभा निवडणूक ही सर्वार्थाने आजवरची चर्चेतील निवडणूक ठरली आहे. निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली महाविकास आघाडी आणि ऐनवेळी भाजपला पाठिंबा देणारे अजित पवार यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण आजवरचं राजकारण ढवळून निघालं. त्यांनी भल्या सकाळी घेतलेला शपथविधी देखील बराच गाजला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पण तीन दिवसांच्या आतच अजित पवारांचं हे बंड शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आल्याने फडणवीस यांचं सरकार अवघ्या ८० तासात कोसळलं होतं. त्यानंतर यथासांग शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. ज्यामध्ये अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले.

आता अजित पवारांची मुलंही राजकारणात...

आतापर्यंतच्या राजकीय करिअरमध्ये अनेक घोटाळ्यांचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले. २०१३मध्ये धरणात पाणी आणण्याबाबत त्यांनी केलेले विधान राजकारणात वादग्रस्त ठरले होते. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. अजित पवार यांची पुढची पिढी आता राजकारणात उतरली आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरले होते. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टाइम्स नाऊ मराठीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी