deputy cm devendra fadnavis congrats new speaker of maharashtra legislative assembly rahul narvekar : मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष झाले. बहुमताने त्यांची निवड झाली. नार्वेकर यांना १६४ मते मिळाली. यानंतर नव्या विधानसभाध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी झालेल्या भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे कौतुक केले. राहुल नार्वेकर देशातील सर्वात तरुण विधानसभाध्यक्ष आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नार्वेकरांचे मूळ गोव्यात पण ते पुढे महाराष्ट्रात सावंतवाडी येथे स्थायिक झाले. राहुल नार्वेकर तर दीर्घ काळापासून मुंबईत आहेत. मुंबई हीच त्यांची कर्मभूमी आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत असलेल्या राहुल नार्वेकर यांना राजकारण आणि समाजकारणाचा वारसा घरातून वडिलांच्या रुपाने मिळाला. राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर हे मुंबई महापालिकेत कुलाबा मतदारसंघाचे नगरसेवक होते. सध्या राहुल यांचे भाऊ मकरंद नार्वेकर (वॉर्ड २२७) आणि राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर (वॉर्ड २२६) हे दोघे मुंबई मनपाचे नगरसेवक आहेत. स्वतः राहुल नार्वेकर हे मुंबईच्या कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पहिल्यांदाच विधानपरिषदेत म्हणजे ज्येष्ठांच्या सभागृहात सासरेबुवा सभापती आणि थेट लोकांनी निवडून दिलेल्यांच्या सभागृहात म्हणजेच विधानसभेत जावई विधानसभाध्यक्ष आहेत. योगायोगाने हा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल नार्वेकर यांनी आधी १५ वर्षे वकिली केली. अनेक संस्थांना कायदेशीर सल्ला दिला. पुढे विधानसभेत आले. त्यांना राष्ट्रकुल संघटेनाचा पुरस्कार मिळाला आहे. ते एक उत्तम संसदपटू आहेत. त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची जाण आहे आणि कायद्याचा अभ्यास आहे. विधानसभेत चालणाऱ्या कामकाजात लोकप्रतिनिधींनी कोणत्या आयुधांचा कधी आणि कसा वापर करावा, जनहितासाठी कसे काम करावे याची उत्तम जाण राहुल नार्वेकर यांना आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे. या आधीच्या अध्यक्षांनीही उत्तम काम केले आहे. आता राहुल नार्वेकर आपल्या अनुभवाचा वापर करून सभागृह हाताळतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सासऱ्याच्या कुंडलीतला दशम ग्रह म्हणजे जावई असे पु.ल. देशपांडे म्हणाले होते. पण राहुल नार्वेकर यांच्या बाबतीत वेगळे आहे. जावई आणि सासरे यांचे प्रेमाचे संबंध आहेत त्यामुळे काळजीचे कारण नाही; असे देवेंद्र फडणवीस मिश्कीलपणे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.