महाराष्ट्रातील कोरोना चाचण्या वाढवा, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

devendra fadanvis letter to cm uddhav thackeray on corona test issue महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

devendra fadanvis letter to cm uddhav thackeray on corona test issue
देवेंद्र फडणवीस 

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रातील कोरोना चाचण्या वाढवा, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
  • महाराष्ट्रात प्रतिदिन कोरोना चाचण्या ९२ हजारांवरुन ७५ हजारांवर
  • भारताची ९ टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात पण कोरोनाचे ४१ टक्के मृत्यू राज्यात

मुंबईः कोरोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. (devendra fadanvis letter to cm uddhav thackeray on corona test issue)

कोरोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने कोरोना चाचण्या होणे आवश्यक आहे. कोरोनाच्या रुग्णांना शोधून त्यांना वेळेवर उपचार देणे गरजेचे आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधीत ज्या महाराष्ट्रात आहेत तिथे काही काळापूर्वी दररोज ९२ हजार चाचण्या होत होत्या. आता एकदम या चाचण्यांच प्रमाण ७५ हजारांवर आले आहे. महाराष्ट्रात अद्याप एक लाख ८५ हजार २७० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत कोरोना चाचण्यांची संख्या कमी करण्याऐवजी दररोज जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे आवश्यक आहे. हा मुद्दा पत्राद्वारे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितला आहे.

मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले आहे. कोरोना चाचण्या वाढवून परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. मात्र ठाकरे सरकारने चाचण्यांची संख्या कमी केली आहे. चाचण्या कमी केल्यास संकटाची वेळेवर होणारी जाणीव योग्य प्रकारे होणार नाही आणि उपाय करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जास्त कालावधी लागेल. फडणवीस यांनी ही बाब पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांची संख्या दीड लाखांपर्यंत नेण्याचा मनोदय नुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जाहीर केला होता. प्रत्यक्षात राज्यात प्रतिदिन चाचण्या ९२ हजारांवरुन ७५ हजारांवर आल्या आहेत. चाचण्यांच्या संख्येत प्रतिदिन घट सुरू आहे. चाचण्या कमी केल्यामुळे कदाचित रूग्णसंख्या कमी दाखविणे शक्य होईल. पण, कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही आणि याचा फटका अर्थव्यवस्था खुली करण्याला बसेल, अशी चिंता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत १२ लाख ७० हजार १३१ कोरोना चाचण्या झाल्या. याचा अर्थ प्रतिदिन चाचण्यांची सरासरी ८४ हजार ६७५ होती. यानंतर १६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यात १३ लाख ७६ हजार १४५ कोरोना चाचण्या झाल्या. याचा अर्थ प्रतिदिन चाचण्यांची सरासरी ९१ हजार ७४३ होती. मात्र १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात ११ लाख २९ हजार ४४६ कोरोना चाचण्या झाल्या. याचा अर्थ चाचण्यांची प्रतिदिन सरासरी ७५ हजार २९६ होती. चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय घट करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. पण मुंबईत १ ते १५ सप्टेंबर दरम्यान १ लाख ७४ हजार १३८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातून २७ हजार ७९१ कोरोना रुग्ण आढळले. संसर्गाचा हा दर १५.९५ टक्के होता. नंतर १६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मुंबईत १ लाख ७९ हजार ७५७ कोरोना चाचण्या झाल्या. या चाचण्यांमधून ३१, ६७२ कोरोना रुग्ण आढळले. कोरोना संसर्गाचा दर १७.६१ झाला. यानंतर १ ते १५ ऑक्टोबर या काळात मुंबईत १ लाख ८० हजार ८४८ कोरोना चाचण्या झाल्या. या चाचण्यांमधून ३१ हजार ४५३ कोरोना रुग्ण आढळले. संसर्गाचा दर १७.३९ टक्के होता. याचा मुंबईचा कोरोना संसर्गाचा दर आजही १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 

मुंबईत १ ते १५ सप्टेंबर दरम्यान कोरोनामुळे ५७२ मृत्यू झाले तर १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान कोरोनामुळे ६९९ मृत्यू झाले. यानंतर मुंबईत १ ते १५ ऑक्टोबर या काळात ६७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याचा अर्थ कोरोनामुळे मुंबईत मोठ्या संख्येने अद्याप मृत्यू होत आहेत.

मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले असताना महाराष्ट्र सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या ९२ हजारांच्या घरातून ७५ हजारांवर आणून ठेवली आहे. कोरोना संसर्ग आणि कोरोना मृत्यू यांचे प्रमाण वाढत असताना सरकार कोरोना चाचण्या वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करताना दिसत नाही. याचे कारण काय, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. 

भारतात प्रतिदशलक्ष ९७.६ कोरोना मृत्यू आहेत पण फक्त महाराष्ट्राचा विचार केल्यास प्रतिदशलक्ष कोरोना मृत्यूचे प्रमाण ३३३ आहे. राज्याचे कोरोना मृत्यूचे प्रमाण देशाच्या तुलनेत (राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत) चार पटीने जास्त आहे. देशातील नऊ टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. पण देशातील ४१ टक्के कोरोना मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. 

भारतातील एकूण कोरोना रुग्णांचा विचार केल्यास २२ टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्रातील आहेत. असे असले तरी राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत मात्र महाराष्ट्र सातत्याने मागे आहे. महाराष्ट्रात, मुंबईत परिस्थिती लवकर पूर्वपदावर आणायची असेल, तर चाचण्यांवर भर द्यावा लागेल. कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने अर्थव्यवस्था खुली करण्यात अनेक समस्या येत आहेत. समाजातील प्रत्येक घटक आता प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. ही बाब लक्षात घेऊन चाचण्यांची संख्या वाढवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी