कोरोनासाठी विक्रमी हॉस्पिटलमधून विक्रमी भ्रष्टाचार, फडणवीसांचा घणाघात

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरले.

Devendra Fadanvis Slams Maharashtra Government
कोरोनासाठी विक्रमी हॉस्पिटलमधून विक्रमी भ्रष्टाचार, फडणवीसांचा घणाघात 

थोडं पण कामाचं

  • कोरोनासाठी विक्रमी हॉस्पिटलमधून विक्रमी भ्रष्टाचार, फडणवीसांचा घणाघात
  • ठाकरे सरकारने राज्यपालांना पाठवलेले अभिभाषण चौकातल्या भाषणासारखे - फडणवीस
  • फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरले

मुंबईः ठाकरे सरकारने राज्यपालांना पाठवलेले अभिभाषण चौकातल्या भाषणासारखे असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणात कोणतीही ठोस आकडेवारी नाही की आलेख नाही, असेही फडणवीस म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरले. (Devendra Fadanvis Slams Maharashtra Government)

राज्यपाल-सरकार संघर्ष नवा नाही. पण या कारणासाठी राज्यपालांना विमान नाकारणे योग्य नाही. राज्यपालांचा अपमान करणे चुकीचे होते, असे फडणवीस म्हणाले. मनात आल्यासारखा कारभार सुरू आहे. कोणताही मंत्री उठतो, कुठेही जातो आणि लॉकडाऊन लावून येतो. लॉकाडाऊनचा पोरखेळ सुरू आहे का? बालकांना सॅनिटायझर पाजले. हे सगळे काय सुरू आहे? राज्यातील कोविड सेंटर भ्रष्टाचाराचे कुरण झाली आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

ठाकरे सरकारने कोरोना संकट हाताळण्यासाठी कमी वेळेत विक्रमी हॉस्पिटल उभी केल्याचे सांगितले. 'तुम्ही केले पण त्यात विक्रमी भ्रष्टाचार केला', असा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

एक हजार खुर्च्यांचे भाडे साडेचार लाख रुपये. एका पंख्याचे भाडे नऊ हजार रुपये; अशी आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. कोरोना काळातील भ्रष्टाचारावर पुस्तिका काढून घोटाळे जगजाहीर करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

कोरोना महामारीची परिस्थिती हाताळण्यासाठी ज्यांची नियुक्ती झाली किंवा ज्यांना कंत्राटे देण्यात आली त्यातील किती जणांना वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा अनुभव होता, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थि केला. डॉक्टर यांची जबाबदारी कंपाउंडर यांना देण्यात आली; असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

राज्यात फेसबुक लाइव्ह सुरू आहे. मागच्यावेळी मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाइव्ह चांगले झाले. ते आम्हाला आवडले. पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणाले. तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हालाही तेच सांगायचे आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तो ऐका. मुख्यमंत्री साहेब तुमचा आवाज महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचत नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

कोरोनामुळे ५२ हजारांपेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले. चाचण्यांची संख्या कमी केली तरी राज्यातला वेगाने वाढणारा कोरोना संसर्ग लपून राहिलेला नाही. ही बिकट परिस्थिती असताना राज्य सरकार कोरोना संकट हाताळण्याच्या बाबतीत स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आधी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' आता 'मीच जबाबदार' म्हणजे सरकार हात झटकणार. तुमची जबाबदारी तुम्हीच घ्या. अर्धी जबाबदारी जनतेची आणि अर्धी मोदी सरकारची. तुमची जबाबदारी काहीच नाही, अशा शब्दात ठाकरे सरकारला फडणवीस यांनी जाब विचारला. देशभरात धार्मिक स्थळे उघडली तिथे कोरोना होत नाही. पण महाराष्ट्रात धार्मिक स्थळ कोरोनाची तीव्रता वाढवत आहे, असे राज्य सरकारला वाटते; अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारच्या दुसऱ्यावर दोष ढकलण्याच्या वृत्तीवर टीका केली. 

याआधी कोरोना काळातील वीज देयकांच्या थकबाकीसाठी शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडणाऱ्या राज्य सरकारच्या कारभाराविषयी तीव्र शब्दात फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार सामान्यांना अडचणीत टाकत असल्याचे फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी