राज्याच्या अतिवृष्टी भागात देवेंद्र फडणवीस करणार दौरा, बारामतीतून पाहणी दौऱ्याला सुरुवात

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 17, 2020 | 14:21 IST

Devendra Fadnavis: राज्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत. १९ ऑक्टोबर पासून त्यांचा दौरा सुरू होईल.

Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो) 

थोडं पण कामाचं

  • अतिवृष्टी भागात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तीन दिवस दौरा 
  • दौऱ्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या भेटी घेणार

मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस (Heavy rainfall) पडला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा (Marathwada) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तीन दिवसांचा दौरा करणार आहेत.

असा असेल देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

१९ ऑक्टोबर पासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. आपल्या दौऱ्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस हे बारामतीपासून करणार आहेत. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील.

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तर तिसर्‍या दिवशी (२१ ऑक्टोबर) रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत देवेंद्र फडणवीस हे नऊ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

केवळ घोषणा नको, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या: देवेंद्र फडणवीस

परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी सुद्धा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

शेतकऱ्यांना तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्‍याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी