फडणवीसांनी शिंदेंच्या हाताला धरलं अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं, समजून घ्या राजकारणातील ही खेळी!

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 07, 2022 | 19:34 IST

एकनाथ शिंदे यांना स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी हाताला धरुन मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवलं. ज्याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहे. जाणून घेऊयात याचविषयी विस्तृतपणे.

devendra fadnavis grabbed eknath shinde hand and seated him in chief ministers chair understand this game in politics
शिंदेंच्या हाताला धरलं अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं! 
थोडं पण कामाचं
  • देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या हाताला धरुन बसवलं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत
  • फडणवीसांच्या या कृतीने निघतात अनेक राजकीय अन्वयार्थ
  • एकनाथ शिंदेंना भाजपने बनवलं आणखी शक्तीशाली

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज (7 जुलै) मंत्रालयातील (Mantralay) आपल्या कार्यालयात येऊन मुख्यमंत्रिपदाचा औपचारिकरित्या कारभार स्वीकारला. यावेळी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्र्यांच्या दालनात हजर होते आणि त्यांनी अगदी हाताला धरून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं. त्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. मात्र, एका घटनेचा विविध बाजूने राजकीय अन्वयार्थ आपल्याला लावता येतील. 

सलग पाच वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेच्या एका नेत्याला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवणं हे खरं तर राजकीय दृष्ट्या खूपच वेगळ्या प्रकारचं चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसात ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्याचे अनेक राजकीय पैलू आहेत आणि त्याचाच आपण उहापोह करणार आहोत. 

२०१४ साली केंद्रात शक्तिशाली बहुमत मिळवून नरेंद्र मोदी यांचं सरकार अस्तित्वात आलं. तेव्हापासून भाजपने आपल्या राजकारणाचा बाजच बदलून टाकला. देशासोबतच प्रत्येक राज्यातील सत्ता आपल्याला मिळावी यासाठी भाजपने गेल्या ८ वर्षात साम-दाम-दंड-भेद या सगळ्याचा वापर केला. सत्तेसाठी अनेक राज्यात उरफटे डावही टाकले. त्याचाच प्रत्यय आता आपल्याला महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत आहे. 

शिवसेनेला राजकीय दृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न?

महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी शिवसेनेची विधानसभेत पुरेशी ताकद आहे, हे दोन विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं आहे. त्यामुळे भाजपला एकहाती सत्ता मिळविण्यात शिवसेनाच अडसर ठरत असल्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच घटक पक्षालाच संपविण्याचा डाव भाजपने यावेळी टाकल्याचं पाहायला मिळतं आहे. 

अधिक वाचा: मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का देणार?

२०१४ साली युती तुटल्यानंतर देखील सत्तेसाठी भाजपला शेवटी शिवसेनेसोबतच हातमिळवणी करावी लागली. पण प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याचे सोपस्कार भाजपला पार पाडावे लागत होते. त्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर भाजप आणि शिवसेनेत प्रचंड मोठी दरी पडली. ज्यामुळे भाजपला १०५ आमदार घेऊन सरळ विरोधी पक्षात बसावं लागलं. 

हीच गोष्ट भाजप नेत्यांच्या प्रचंड लागली आणि इथूनच सुरु झाला शिवसेनेला संपविण्याचा डाव रचला गेला.. महाराष्ट्रात शिवसेना म्हणजे ठाकरे असं आजवरचं समीकरण होतं. मात्र, ठाकरेंशी चर्चा न करता आपलं सरकार पुन्हा कसं सत्तेत येईल यासाठी भाजपने एक मास्टरप्लॅन आखला. ज्यामध्ये त्यांच्या गळाला लागले शिवसेनेचे सर्वात वजनदार नेते एकनाथ शिंदे. 

एकनाथ शिंदे यांनी २०१४ साली फडणवीसांसोबत मंत्रिमंडळात काम केलं असल्याने त्यांचे फडणवीसांशी खूप चांगले संबंध होते. त्यातच २०१९ साली शरद पवारांमुळे मुख्यमंत्रिपद हुकल्याने ते महाविकास आघाडीत नाराजच होते. या सगळ्या गोष्टी हेरून मोक्याच्या क्षणी भाजपने शिंदेंनाच गळाला लावलं. 

अधिक वाचा: "फडणवीसांनी काल शिंदेंकडून माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील समजणार नाही" : उद्धव ठाकरे

भाजपसारखा शक्तिशाली पक्ष आपल्या पाठिशी आहे म्हटल्यांवर एकनाथ शिंदेंनी देखील थेट ५० आमदार फोडले. या सगळ्यात भाजपने अत्यंत हुशारीने शेवटपर्यंत एकनाथ शिंदे यांनाच पुढे केलं. जेव्हा त्यांच्या समर्थक आमदारांचा आकडा हा दोन तृतीयांशापेक्षा पुढे गेला तेव्हा भाजपने या सत्ताकारणात एंट्री घेतली.

या सगळ्यात आपले आमदार परत आणावे यासाठी शिवसेना नेतृत्वाने अनेक डाव टाकले, पण शिंदे कशालाही बधले नाही. अखेर उद्धव ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ज्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपने ठाकरेंना बाजूला सारून सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरु केल्या. ते देखील शिवसेनेतील एका नेत्याशी. 

ठाकरे घराणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत वजनदार घराणं आहे. पण भाजपने अशी काही रणनिती आखली की, अवघ्या काही दिवसातच त्यांनी ठाकरेंचं वजन कमी केलं आणि सत्तेसाठी एकनाथ शिंदेसोबत वाटाघाटी सुरु केल्या. 

अधिक वाचा: उद्धव ठाकरेंसमोर नेत्यांसह कार्यकर्ते वाचवण्याचं आव्हान; आता नगरसेवकांनाही शिंदे गटाचा ओढा

मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी रंगलेला एक वेगळाच डाव 

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून येणार असंच सारे जण म्हणत होते. मात्र, मोदी-शहा आणि नड्डांच्या मनात नेहमी प्रमाणेच धक्कातंत्राचा वापर करावं असं आलं आणि शेवटच्या क्षणी सूत्रं फिरली. ज्या फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होतं त्यांनीच जाहीर केलं की, मुख्यमंत्री मी नाही तर एकनाथ शिंदे असतील.

खरं म्हणजे या सगळ्या केंद्रीय नेतृत्वाने एकाच खेळीत अनेक पक्षी मारले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी बसून त्यांचं राजकीय वजन प्रचंड वाढलं आणि ठाकरेंना शिवसेनेतच पर्याय उभा केला. आधीच बंडखोरीने शिवसेनेची शकलं झालेली असताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन ठाकरेंशी चर्चा करण्याची गरज नाही हे भाजपने स्पष्ट करुन टाकलं.

अधिक वाचा: "आधीचे अडीच वर्ष ते आलेच नाहीत अन् आताही तडजोडीने लंगड्या घोड्यावर बसले" सामनातून फडणवीसांवर निशाणा

दुसरीकडे शिंदे यांच्या पाठिशी असलेलं आमदारांचं संख्याबळ लक्षात घेता हे सरकार टिकण्यासाठी शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून योग्य असतील असं केंद्रीय नेतृत्वाला वाटलं. ज्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा घास हातातोंडाशी आलेला असताना फडणवीसांना गमवावा लागला. 

शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आपणच मोठे आहोत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा दाखवून दिलं. याच सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे आज स्वत: देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेंच्या हाताला धरुन त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवावं लागलं. आता ही देवेंद्र फडणवीसांची अगतिकता म्हणायची, अपरिहार्यता की अचूक खेळी याचं उत्तर हे येणारा काळच देईल!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी