भाजपला 50-50 चा फॉर्म्युला मान्य, पण एक अट...शिवसेनेपुढे नवी ऑफर

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 03, 2019 | 16:15 IST

विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्यानंतर निकाल लागून नऊ दिवस झालेत. पण अद्यापही राज्यात कोणत्याही पक्षानं सत्तास्थापन केली नाही. शिवसेना भाजपला राज्यातल्या मतदारांनी महायुतीला मतदान केलं.

Uddhav Thackeray and cm
भाजपला 50-50 चा फॉर्म्युला मान्य; शिवसेनेपुढे नवी ऑफर, पण एक अट... 

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला.
  • महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मंत्रिपदांच्या वाटपावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नवा प्रस्ताव दिल्याचं समजतंय.

विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्यानंतर निकाल लागून नऊ दिवस झालेत. पण अद्यापही राज्यात कोणत्याही पक्षानं सत्तास्थापन केली नाही. शिवसेना भाजपला राज्यातल्या मतदारांनी महायुतीला मतदान केलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मंत्रिपदांच्या वाटपावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. राज्याला अद्याप नव्या सरकारची आणि मुख्यमंत्र्याची प्रतिक्षा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नवा प्रस्ताव दिल्याचं समजतंय. या संदर्भातलं वृत्त द इंडियन एक्स्प्रेस नं दिलं आहे. 

शिवसेनेनं भाजपला 50-50 फॉर्म्युल्याची मागणी केली. यात सत्तेचं समसमान वाटप आणि मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षांसाठी असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर भाजपनं शिवसेनेसमोर मंत्रिपदांच्या वाटपाबाबत 26-13 असा प्रस्ताव मांडला. त्यावर दोन दिवसांचा अल्टिमेटम देखील देण्यात आला होता. या प्रस्तावात भाजपकडे मुख्यमंत्रीपदासह 26 मंत्रिपदं आणि उपमुख्यमंत्रीपदासह 13 मंत्रीपद शिवसेनेकडे असं सांगण्यात आलं होतं. भाजपचा तो प्रस्ताव धुडकावल्यानंतर भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेकडे नवा प्रस्ताव ठेवल्याचं समजतंय. या नव्या प्रस्तावानुसार भाजपकडे मुख्यमंत्रीपद ठेवून मंत्रिमंडळात शिवसेनेला समान वाटा देण्यात येतील, असं आश्वसन भाजपकडून शिवसेनेला देण्यात आलं. या प्रस्तावामुळे उद्धव ठाकरे महत्त्वाची खाती स्वीकारून मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडण्याची शक्यता आहे.  भाजपनं दिलेल्या मंत्रिपदाच्या ऑफरमध्ये गृह, अर्थ, नगरविकास, महसूल या खात्यांचा समावेश नाही आहे. तर शिवसेनेकडून महसूल आणि नगरविकास खात्यांसाठी आग्रह धरण्यात आला आहे. मात्र तो मान्य होण्याची शक्यता नसल्याचं भाजपमधल्या सुत्रांनी सांगितलं होतं.

मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात भाजपनं शिवसेनेला केंद्रीय मंत्रीमंडळात एक अतिरिक्त मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद द्यावं, तसंच शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करावी, अशा मागण्या शिवसेनेनं भाजपसमोर मांडल्याचं एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच राज्यातील सहकार क्षेत्रातल्या संस्थांमध्ये शिवसेनेचं 50 टक्के नियंत्रण असावं, अशी मागणीही उद्धव ठाकरेंकडून करण्यात आल्यात.  शुक्रवारी रात्री उशिरा फडणवीस यांच्याकडून उद्धव यांना हा नवा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतंय. तर पुढच्या येत्या दोन दिवसांत फडणवीस आणि ठाकरे यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी