तुम्हाला रात्री झोप लागणार नाही, पूजा चव्हाण प्रकरणी फडणवीसांनी सुनावले

devendra fadnavis slams maharashtra government over pooja chavan issue पूजा चव्हाण प्रकरणात बोलताना कायदा सुव्यवस्थेच्याप्रश्नी फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.

devendra fadnavis slams maharashtra government over pooja chavan issue
तुम्हाला रात्री झोप लागणार नाही, पूजा चव्हाण प्रकरणी फडणवीसांनी सुनावले 

थोडं पण कामाचं

  • तुम्हाला रात्री झोप लागणार नाही, पूजा चव्हाण प्रकरणी फडणवीसांनी सुनावले
  • कायदा सुव्यवस्थेच्याप्रश्नी फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केले लक्ष्य
  • पूजा चव्हाण प्रकरणात बारा ऑडिओ क्लिप उघड झाल्या - फडणवीस

मुंबईः पूजा चव्हाण प्रकरणात बारा ऑडिओ क्लिप उघड झाल्या आहेत. पहिल्यांदाच एवढा मोठा थेट पुरावा उघड झाला आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील कायदा सुव्यवस्था या विषयावर बोलत होते. यावेळी बोलताना कायदा सुव्यवस्थेच्याप्रश्नी फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. (devendra fadnavis slams maharashtra government over pooja chavan issue)

तुम्ही पोलिसांवर दबाव आणून त्यांना कदाचित वाचवून घ्याल. पण तुम्ही रात्री झोपू नाही शकणार; असे म्हणत पूजा चव्हाण प्रकरणात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणखी आक्रमक झाले. त्यांनी विधानसभेत बोलताना पूजा चव्हाण प्रकरणात सरकारी हस्तक्षेप करुन संजय राठोड यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला.

राजकीय वर्तुळात असल्यामुळे संजय राठोड हे आमचे मित्र आहेत. वीस - वीस वर्ष सोबत काम केलेल्या व्यक्तीबाबत बोलताना त्रास होतो. आनंद होत नाही. राजकीय आयुष्य घडवायला जन्म लागतो पण ते उद्ध्वस्त व्हायला फार वेळ लागत नाही याची जाणीव असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण आज परिस्थिती काय आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. 

जे काही पूजा चव्हाण प्रकरण घडले यात वीस दिवसांत पोलिसांकडे एकही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. बारा ऑडिओ क्लिप समोर आल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये जेवढे पुरावे आहेत यापेक्षा जास्त पुरावे काय हवे आहेत तुम्हाला? कुठल्याही गुन्ह्यात एवढे थेट पुरावे कधीही असत नाहीत. हे थेट पुरावे आहेत. एवढे पुरावे असून देखील तुमचे पोलीस काम करत नाहीत. माझी तर मागणी आहे पुण्याचे वानवडी पोलीस ठाण्याचे जे पीआय आहेत त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

महाराष्ट्रातल्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे. पण पोलिसांनी इतकी लाचारी कधीही स्वीकारली नव्हती. इतका दबाव सरकारचा? बारा ऑडिओ क्लिप तुमच्याकडे आहेत, फोन तुमच्याकडे आहे, यवतमाळच्या घटनेची लिंक तुमच्याकडे आहे, सगळे टॉवर लोकेशन तुमच्याकडे आहेत. कोण कुठे भेटले याची माहिती तुमच्याकडे आहे. अरुणचा जबाब तुमच्याकडे आहे. एवढे असून देखील तुम्ही एफआयआर नोंदवत नाही. या प्रकरणात कोणाच्या तक्रारीची आवश्यकता नाही. तिच्या आई-वडिलांना तक्रार दाखल करायची नसेल, ते दु:खात असतील त्यांना वाटत असेल अजून बदनामी होईल आता त्यांच्या ज्या आजी आहेत त्यांनी काही तरी आरोप केले आहेत. किंबहुना त्यांचं जे पत्र आहे त्यावरील सुवाच्च अक्षर, त्यावर टाकलेली तारीख यातील विसंगती या सर्वामध्ये मी जात नाही. पण वीस - वीस दिवस कारवाई होत नाही.' असे फडणवीस म्हणाले.

एका व्यक्तीचा जीव जातो, एक अनधिकृतरित्या गर्भपात झाल्याचे समोर येते. पूजा राठोड कोण आहे? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी राजीनामा फ्रेम करायला ठेवलेला नाही. पण कुठे पाठवलेला आहे ते ऐकायला मिळालेले नाही. कदाचित फ्रेम करायला ठेवला असेल. पण ती वेगळी गोष्ट आहे. या ठिकाणी एवढी भयानक घटना आणि अशा ऑडिओ क्लिप असतानाही तुम्ही पोलिसांवर दबाव आणून त्यांना कदाचित वाचवून घ्याल. पण तुम्ही रात्री झोपू नाही शकणार. रात्री झोप येणार नाही तुम्हाला. इतके वर्ष तुम्हाला पाहत आहोत त्यामुळेच आश्चर्य वाटत आहे, असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी