ठाकरे आडनाव लावल्यानं कुणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई
पूजा विचारे
Updated Dec 23, 2019 | 09:17 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर बऱ्याच सक्रीय झाल्याचं दिसत आहेत. यापूर्वी त्यांनी झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करत शिवसेनेवर टीका केली होती.

Amruta fadanvis and uddhav thackeray
ठाकरे आडनाव लावल्यानं कुणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका  |  फोटो सौजन्य: Times Now

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर बऱ्याच सक्रीय झाल्याचं दिसत आहेत. यापूर्वी त्यांनी झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करत शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर आता तर त्यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. ठाकरे आडनाव लावल्यानं कुणी ठाकरे होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. माझं आडनाव गांधी आहे. सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकारणात मोठा गदारोळ झाला. त्यावर फडणवीसांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. ट्विटवर ट्विट करत फडणवीसांनी ही टीका केली होती. त्यांचच ट्विट रिट्विट करत अमृता फडणवीसांनी आठ दिवसांनी टीका केली आहे. 

अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनाही टॅग केलं आहे.  अमृता फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलं की, खरंय देवेंद्रजी, ठाकरे आडनाव लावल्यानं कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी खरं आणि तत्त्वनिष्ठं असावं लागतं. लोकांच्या भल्यासाठी काम करावं लागते. एखाद्यानं स्वतःचे कुटंब आणि सत्ता यांच्या कार्यपद्धतीपेक्षा लोक आणि पक्षाच्या सदस्यांच्या हितासाठी तत्वनिष्ठ विचार करण्याची गरज असते. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलीकडे जाऊन लोकांसाठी प्रामणिकपणे काम करावं लागतं. 

महाराष्ट्रात सत्तेत येताच शिवसेनेने मुंबईतील आरे कॉलनीतील कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय दिला. आरेतील एकही झाड यापुढे कापू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी वृक्षतोडीवर रविवारी एक ट्वीट केलं होतं. एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. अमृता फडणवीस यांनी म्हटलं, "शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार झालाय, लवकर बरे व्हा. तुमच्या सोयीप्रमाणे किंवा दलाली मिळेल तेव्हा झाडांची कत्तल होणार का? हे अक्षम्य पाप आहे". अमृता फडणवीस यांनी ज्या बातमीचा हवाला देत ट्वीट केलं आहे त्या रिपोर्टमध्ये औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १००० झाडांची कत्तल शिवसेना करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी