मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड नुकतीच घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर आता राज्यात नवं सरकार स्थापन होणार आहे. मात्र या सगळ्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे भाजपने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. तसंच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचंही स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळतील असा सर्वच जण अंदाज व्यक्त करत होते. मात्र, भविष्यातील राजकाराणाचा विचार करता देवेंद्र फडणवीसांनी नवीच खेळी खेळली आहे. मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील.
पाहा देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत काय म्हणाले
देवेंद्र फडणवीसांचा शेवटच्या क्षणी मास्टरस्ट्रोक
'उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची कास धरुन ठेवली. पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर बोलणार नाही. जेव्हा आज हे सरकार गेलं त्यानंतर महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देण्यात येईल. मी वारंवार गेली अडीच वर्ष आपल्याला सांगत होतो की, अशी सरकारं चालत नाहीत. हे सरकार कधीही पडेल. अनेक जण मला विचारत होते की, सरकार पडलं की, निवडणुका होतील का? तेव्हा मी आपल्याला सांगायचो की, सरकार पडलं की, तर आम्ही पर्यायी सरकार देऊ. लोकांच्या डोक्यावर निवडणुका आम्ही लादणार नाही.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'म्हणून आज एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात विधीमंडळ गट, भाजपचा विधीमंडळ गट आणि 16 अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार असा एक मोठा गट हा सोबत आलेला आहे. या सगळ्यांचं पत्र आज आम्ही राज्यपालांना दिलं आहे.' असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
अधिक वाचा: उद्धव ठाकरेंसोबत जे झालं ते भारीचं झालं, MNSची भूमिका
'भाजपने हा निर्णय केला की, आम्ही सत्तेच्या मागे नाही आहोत. कुठल्या तरी मुख्यमंत्री पदाकरिता आम्ही काम करत नाहीत. ही तत्वाची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने हा निर्णय घेतला आहे की, एकनाथ शिंदे साहेब यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज ७.३० वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी या ठिकाणी होईल.' अशी अत्यंत मोठी आणि सर्वांचे अंदाज चुकवणारी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
'लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करु. या विस्तारात शिवसेनेचे शिंदे साहेबांसोबत असलेले अपक्षांमधील आणि भाजपचे असे सगळे लोकं हे नव्या मंत्रिमंडळात येतील.'
'मी स्वत: बाहेर असेन पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी असली पाहिजे. त्याकरिता साथ आणि पूर्ण समर्थन या सरकारला देईन. मला अतिशय आनंद आहे की, पुन्हा एकदा हिंदुत्व विचाराचं, बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले हिंदुत्व, भाजप जे हिंदुत्व मांडतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं पंतप्रधान मोदी यांनी जे व्हिजन दाखवलंय ते पुढे नेण्यासाठी कारण आपण बघितलं की, आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ज्या वेगाने महाराष्ट्राचा विकास झाला तो वेग गेल्या अडीच वर्षात पूर्णपणे संपलेला आहे.' अशी घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे.
'मात्र, आता मला विश्वास आहे की, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात मेट्रो असेल, वेगवेगळे प्रोजेक्ट असतील किंवा ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल इम्पेरिकल डेटा पूर्ण करुन सर्वोच्च न्यायालयात जाऊन ओबीसीला पुन्हा आरक्षण बहाल करणे हा विषय असेल किंवा इतर सगळे विषय हे निश्चित टप्प्यावर जातील प्रत्येक समजाला आणि दुर्बल घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल असा मला विश्वास आहे. म्हणून मी आमच्या सगळ्यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.'
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.