अजित पवार की धनंजय मुंडे?, शरद पवारांसमोर एक मोठा प्रश्न!

मुंबई
रोहित गोळे
Updated Oct 26, 2019 | 15:19 IST

विरोधी पक्ष नेतेपदी कुणाची निवड करायची असा मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर निर्माण झाला आहे. कारण या पदासाठी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. 

dhananjay munde or ajit pawar as leader of opposition sharad pawar will choose exactly who 
अजित पवार की धनंजय मुंडे?, शरद पवारांसमोर एक मोठा प्रश्न!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विधानसभा विरोधी पक्षनेते पदी कुणाची वर्णी लागणार?
  • अजित पवार की धनंजय मुंडे कुणाची होणार निवड?
  • विरोधी पक्षनेते पदाबाबत शरद पवार काय घेणार निर्णय

मुंबई: विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर राज्यात युतीचं सरकार येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. जर भाजप आणि शिवसेनेची बोलणी योग्य रितीने पार पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ जागा निवडून आल्याने विधानसभेत प्रबळ विरोधी पक्षाची धुरा देखील त्यांच्याकडेच जाणार आहे. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्ष नेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असणार आहे. पण आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कारण की, विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद कुणाला मिळणार यावर आता चर्चा सुरु झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यामुळे पवारांच्या जोरावरच राज्यात राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा बरंच चांगलं यश मिळालं. तसंच राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी देखील जबरदस्त लढत देत भाजप-शिवसेनेच्या अनेक दिग्गजांना पाणी पाजलं. पण आता यानंतर विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून कोण नेतृत्व करणार याविषयी चर्चा रंगली आहे. हाच प्रश्न आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासमोर  देखील पडला आहे. 

सध्या विरोध पक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादीतील धनंजय मुंडे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. पण या चर्चेत सध्या धनंजय मुंडे यांचं सर्वात वर आहे. याला मुख्यत्वे दोन कारणं आहेत. एक म्हणजे परळीसारख्या मतदारसंघात त्यांनी विद्यामान मंत्री पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केला. तर दुसरी गोष्ट म्हणजे गेली पाच वर्ष विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपदी तेच होते. यावेळी त्यांनी अनेकदा सत्ताधारी नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सध्या त्यांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी आघाडीवर आहे. 

दुसरीकडे अजित पवार यांच्या नावाची देखील सध्या चर्चा सुरु आहे. कारण की, गेल्या पाच वर्षात धनंजय मुंडे विधानपरिषदेत आवाज उठवत असताना दुसरीकडे विधानसभेत अजित पवारांनी देखील विधानसभेत आपला आवाज बुलंद केला होता. तसंच यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे अजित पवारांनी विरोधी पक्ष नेतेपदी असावं असं एका गटाचं म्हणणं आहे. यामुळे आता स्वत: शरद पवार याबाबत नेमका काय निर्णय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी