धनुष्यबाण ही निशाणी आपलीच.. त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका: उद्धव ठाकरे

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 08, 2022 | 17:02 IST

धनुष्यबाण ही निशाणी आणि शिवसेना हा पक्ष आपलाच आहे आणि आपलाच राहील असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसंच शिवसेनेच्या निशाणीबाबत सध्या भ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे त्याला सामान्य नागरिकांनी बळी पडू नये असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

dhanushyaban sign and shiv sena party is our dont fall into their trap uddhav thackeray press conference matoshri
धनुष्यबाण ही निशाणी आपलीच.. त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका: उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष आपलाच उद्धव ठाकरेंचा दावा
  • मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी केला दावा
  • नागरिकांनी बंडखोर आमदारांनी पसरवलेल्या भ्रमामध्ये अडकू नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'मातोश्री' (Matoshri) या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळी त्यांनी असा दावा केला की, धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेचीच आहे आणि ती निशाणी आणि पक्ष आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

कायद्याचे अभ्यासक आणि घटना तज्ज्ञांशी चर्चा करुनच आपण हे मत मांडत असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. पाहा पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले. 

'धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही'

'एक चर्चा चालली आहे ती शिवसेनेच्या चिन्हाबाबत. धनुष्यबाण. मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की, कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यात जे काही नमूद केलेलं आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याबाबतची चिंता सोडा.' 

'चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की, मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्त्वाचं असतंच. जे आपलं धनुष्यबाण आहे ते कोणीही घेऊ शकत नाही. पण फक्त धनुष्यबाणावरच लोकं विचार नाही करत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा: शिंदेंच्या हाताला धरलं अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं!

'घटनातज्ज्ञ, कायद्याच्या अभ्यासकांशीही केली चर्चा'

'याचा अर्थ असा होत नाही की, नवीन चिन्हाचा विचार करा वैगरे. हे मी मुद्दामून तुम्हाला सर्वांना एकत्र बोलावून ठामपणे सांगतोय की, शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे घटनातज्ज्ञ किंवा कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी आपल्याला सांगतोय. उगाच माझ्या मनातलं तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी बोलत नाहीए.' 

अधिक वाचा: संजय राऊतांनी पवित्रा बदलला, बंडखोर आमदारांना म्हणाले...

'दुसरं म्हणजे जे काही फोटो आता येत आहेत की, एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले.. मुळात आता सगळ्या महापालिका, पालिका या आता अस्तित्वात नाहीएत. त्यामुळे हे म्हटलं तर आता त्यांच्ये व्यक्तीगत कार्यकर्ते असू शकतात. त्यांच्या आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारसीमुळे उमेदवारी दिली होती. अशी जी काही त्यांची लोकं असतील ती गेली असतील.' उद्धव ठाकरेंनी अशी खंतही यावेळी व्यक्त केली.

'साध्या-साध्या माणसांना मोठं केलं. तोच आमचा अभिमान'

'मला आज देखील अभिमान वाटतो की, साधी-साधी लोकं येत आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे का याचा विचार न करता साध्या-साध्या माणसांना मोठं केलं. तोच आमचा अभिमानाचा विषय आहे.' 

'आज ज्यांना साध्या लोकांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं ही लोकं मोठी झाली ती मोठी झालेली माणसं गेली. पण ज्यांनी मोठं केलं ती साधी माणसं आजही शिवसेनेसोबतच आहेत. ही लोकं सोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहचवू शकत नाही.' असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

अधिक वाचा: उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?, दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद

'शिवसेना आमचीच...'

'मुद्दा काय येतो... शिवसेना कोणाची? शिवसेना आहे ती आहेच. शिवसेना ही काही गोष्ट नाही की, कोणी घेऊन पळत सुटला. कोणी चोरुन नेऊ शकेल अशी शिवसेना नाहीए. एक जो फरक आहे विधिमंडळ पक्ष आणि बोलीभाषेत म्हणायचा तर रस्त्यावरचा पक्ष. शेवटी रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरत असतो. जनता त्याला आशीर्वाद देत असते. मग पक्षाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत ते लोकसभेत जात असतात.' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'पक्षाचा एकच आमदार असला आणि तोही सोडून गेला तर?'

'कधी काळी आमचा देखील एकच आमदार होता. तेच जर का गेले असते त्यावेळी पक्ष सोडून... समजा कोणाचा एकच आमदार आहे तो गेला सोडून तर पक्ष संपतो का? तर नाही संपू शकत. कारण एक आमदार असो की ५० हे सगळे गेले तरी पक्ष अस्तित्वात असतो. आमदार जाऊ शकतात पक्ष जाऊ शकत नाही. हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.' 

'त्या संभ्रमातून तमाम नागरिकांना हेच सांगतोय की, तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोदंणीकृत पक्ष हा वेगळा असतो. त्यामध्ये असंख्य मतदार, नागरिक, सदस्य, पदाधिकारी अशा अनेक गोष्टी असतात.'

अधिक वाचा: 'ही' देवेंद्र फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?

'पदाधिकाऱ्यांना असं उचलून नेलं जात नाही. सगळ्यांनाच आमिष आणि दमदाट्या करुन नेऊ शकत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की, धनुष्यबाण याबाबत कोणताही संभ्रम कोणीही मनात ठेवू नका. धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो आपल्याकडेच राहील. हे मी घटनातज्ज्ञांशी बोलूनच सांगतो.' असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

'माझ्यासोबत असलेल्या १५-१६ आमदारांचं जाहीर कौतुक करायचं आहे'

'आज सुद्धा जे १५-१६ आमदार सोबत आहेत त्यांचं मला जाहीर कौतुक करायचं आहे. त्यांना अनेक धमक्या, आमिषं देण्यात आली. तरीही ते मागे हटले नाहीत.' 

'माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. कोर्टात जो काही निकाल लागेल तो निकाल फक्त शिवसेनेच्या भवितव्याच्या नसेल. देशामध्ये लोकशाहीचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे. हे ठरवणारा असा हा निकाल असणार आहे.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी