शरद पवारांची आणखी एक खेळी, राज ठाकरेंना टाळी?

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 27, 2019 | 13:06 IST

Mns Minister: राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. अशावेळी या मंत्रिमंडळात  थेट मनसेला मंत्रिमंडळाला स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे.  

discussion that mns will get a seat in the maharashtra vikas aaghadi cabinet
शरद पवारांची आणखी एक खेळी, राज ठाकरेंना टाळी?  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • नव्या सरकारमध्ये मनसेला संधी मिळणार?
  • मनसेला एक मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा
  • शरद पवार खेळणार आणखी एक खेळी?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कायमच देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. राज्यातील राजकारणात तर पवारांच्या भूमिकेला अनन्य साधारण असं महत्त्व असतं. हे नुकतंच पवारांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे अनेकांना असं कायम वाटतं की, शरद पवार यांची कृपादृष्टी आपल्यावर असावी. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर पवारांनी आपल्या राजकीय कौशल्याची काय चुणूक आहे हे संपूर्ण देशाला दाखवून दिलं. यामुळे अनेक राजकीय पक्ष आता त्यांच्याशी जवळीक करत आहेत. अशातच आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत येणार असल्याने शरद पवार आता आणखी एक खेळी करण्याची शक्यता आहे. ती म्हणजे मनसेला टाळी देण्याची. 

गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्ष राष्ट्रवादीच्या अधिक जवळ येत असल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने निवडणूक न लढवता देखील भाजपविरोधी प्रचार केला होता ज्याचा काहीसा फायदा आघाडीतील पक्षांना देखील झाला होता. त्यानंतर अशी चर्चा सुरु झाली होती की, मनसेला थेट आघाडीमध्ये स्थान द्यावं. ज्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नव्हता. मात्र, काँग्रेसच्या विरोधामुळे मनसेची आघाडीतील वाट रोखली गेली होती. मात्र, आता राज्यात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तास्थापन करत असताना हीच वेळ साधून शरद पवार मनसेला देखील आपल्या वाट्यातील एक मंत्रिपद देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांनी अनेक मतदारसंघात उघड-उघड एकमेकांना मदत केली असल्याचं दिसून आलं. ज्यामुळे युतीला बराच फटकाही बसला. तसं पाहिल्यास या निवडणुकीत मनसेला फार काही चांगलं यश मिळालं नाही. कारण त्यांचा एकच आमदार निवडून आला. पण आता याच एकमेव आमदाराला थेट मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे महाराष्ट्र विकास आघाडीला आपला पाठिंबा देऊ शकते. ज्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेस हे आपल्या वाट्याचं एक राज्यमंत्रिपद मनसेला देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, याबाबत मनसेचे कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले आमदार राजू पाटील यांना जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा ते असं म्हणाले की, याबाबतचा जो काही निर्णय असेल तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घेतील. त्यामुळे आता महाराष्ट्र विकास आघाडीला थेट मंत्रिमंडळात स्थान मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी