'प्रसिद्धीच्या व्हिडीओग्राफीपुरती धावाधाव करु नका', CM शिंदेंना सामनातून टोमणा

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 13, 2022 | 11:45 IST

एकनाथ शिंदे हे पूरपरिस्थिती हाताळताना प्रशासनाला फोनवरुन आदेश देत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचे व्हिडिओ देखील आता व्हायरल झाले आहेत. याच मुद्द्यावरुन सामनातून शिंदेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

dont rush for publicity videography shiv sena criticized to cm shinde saamana editorial
'प्रसिद्धीच्या व्हिडीओग्राफीपुरती धावाधाव करु नका', CM शिंदेंना सामनातून टोमणा  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा टीका
  • एकनाथ शिंदेच्या व्हिडिओग्राफीवरुन सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण
  • अहमदाबाद बुडालं तरी कोणी सवाल विचारत नाही, शिवसेनेची बोचरी टीका

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतत या परिस्थितीला सर्वोतोपरी तोंड देत आहेत. तसंच नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रशासनाला वारंवार याबाबत सूचना देत आहेत. जे आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांचे हे व्हिडिओ व्हायरल होताच आता यावरुन टीका-टिप्पणी देखील सुरु झाली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देखील याच मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंना टोमणा मारण्यात आला आहे. 

'आधीच राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असताना नाशिक, पुणे, पालघरसह काही जिल्ह्यांत 14 जुलैपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंग बाका आहे. राज्यातील नवीन सरकारने केवळ प्रसिद्धीच्या व्हिडीओग्राफीपुरती धावाधाव न करता अतिवृष्टीचे संकट व आपग्रस्तांच्या मदतीसाठी एका गांभीर्याने सज्ज राहायला हवे!' असा टोला सामनाच्या अग्रलेखातून हाणण्यात आला आहे.

अहमदाबाद शहराचं स्वीमिंग पूल झालंय... 

दरम्यान, याचवेळी अवघं अहमदाबाद शहरात पुराच्या पाण्याखाली गेलं आहे. असं असताना त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. मात्र, मुंबईत थोडं जरी पाणी साचलं तरी त्यावर टीका करणारे आता गप्प का आहेत? असा थेट सवालही सामनात यावेळी करण्यात आला आहे. 

पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन-तीन दिवस महाराष्ट्रात अजूनही मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होऊ शकते. आधीच राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असताना नाशिक, पुणे, पालघरसह काही जिह्यांत 14 जुलैपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंग बाका आहे. राज्यातील नवीन सरकारने केवळ प्रसिद्धीच्या व्हिडीओग्राफीपुरती धावाधाव न करता अतिवृष्टीचे संकट व आपग्रस्तांच्या मदतीसाठी एका गांभीर्याने सज्ज राहायला हवे!
  • जून महिन्यात तोंडचे पाणी पळविणाऱ्या पावसाने जुलै महिना सुरू झाल्यापासून मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जोरदार हजेरी लावली आहे. कुठे मुसळधार अतिवृष्टी, तर कुठे मध्यम स्वरूपाची संततधार सुरू असल्याने अवघा महाराष्ट्र ओलाचिंब झाला आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसारखा राक्षसी पाऊस झाला. 
  • पाऊस आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 9 जण मृत्युमुखी पडले. या नऊ जणांसह 1 जूनपासून आतापर्यंत गेलेल्या पाऊसबळींची संख्या आता 76 वर जाऊन पोहोचली आहे. कुठे विजा कोसळून, कुठे पुरात वाहून तर कुठे भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडून हे बळी गेले.
  • सलग आठवडाभर अविश्रांतपणे कोसळणाऱ्या या ‘धो-धो’ पावसाने केवळ मनुष्यहानीच झाली असे नाही, तर अनेक जनावरेही मृत्युमुखी पडली. दुभत्या गाई, म्हशी व बैलांसह आतापर्यंत 125 गुरांच्या मृत्यूची नोंद सरकार दप्तरी झाली असली, तरी पंचनामे होईपर्यंत हा आकडा कितीतरी मोठा झालेला असेल. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आठशेहून अधिक घरे या पावसाने जमीनदोस्त केली.
  • महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राज्यात सरासरीपेक्षा 19 टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि एरवी कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडय़ात गेला आठवडाभर ‘धो धो’ पाऊस कोसळत आहे. नाशिक, कोल्हापूर, नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यांत तर पावसाने कहरच केला. या जिल्ह्यांतील सर्व नद्या, नाले आणि तलाव तुडुंब भरले आहेत. निम्म्याहून अधिक पावसाळा शिल्लक असतानाच अतिवृष्टी झालेल्या अनेक जिल्ह्यांत नद्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते व पूल पाण्याखाली गेले तर नदी-नाल्यांकाठच्या शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले. 
  • गुजरातमध्ये तर मुसळधार पावसाने मोठाच हाहाकार उडविला आहे. संपूर्ण अहमदाबाद जलमय झाले असून अवघ्या शहराचेच ‘स्वीमिंग पुला’मध्ये रूपांतर झाले आहे. एरवी मुंबईत टीचभर पाणी साचले तरी मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ झाली म्हणून पालिकेची बदनामी करणारी तोंडे अहमदाबादमधील भयंकर परिस्थितीवर मात्र अवाक्षरही काढताना दिसत नाहीत. नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत राजकारण व्हायला नको हे खरेच, पण हा न्याय देशातील सर्वच शहरांना का लागू नये?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी