due to aurangabad division result of ssc and hsc is likely to be delayed : मुंबई : औरंगाबाद विभागाच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्राचा दहावी बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल १० जूनपर्यंत आणि बारावीचा निकाल १५ जूनपर्यंत लागणे अपेक्षित आहे. पण औरंगाबाद विभागात पेपर तपासण्याचे काम सावकाश सुरू असल्यामुळे निकालांची तारीख लांबण्याची शक्यता आहे.
दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी महाराष्ट्रात सुरू आहे. तपासणीच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा राज्याच्या बोर्डाने घेतला. यावेळी औरंगाबाद वगळता इतर सर्व विभागांमध्ये दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाल्याचे आढळून आले. पण औरंगाबाद विभागात दहावी बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सावकाश सुरू आहे. यामुळे केवळ एका विभागामुळे महाराष्ट्राचा दहावी बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
बोर्डाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन औरंगाबाद विभागाला ताकीद दिल्याचे समजते. उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढवण्याच्या सूचना औरंगाबाद विभागाला देण्यात आल्याचे वृत्त आहे. औरंगाबाद विभागाने उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढवला अथवा राज्यातील इतर विभागांच्या मदतीने वाया गेलेला कालावधी भरून काढला तर निकाल वेळेत लागेल. पण तसे झाले नाही तर निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
अद्याप दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखा बोर्डाकडून अधिकृतरित्या जाहीर झालेल्या नाही. साधारपणे दरवर्षी १० जूनपर्यंत दहावीचा आणि १५ जूनपर्यंत बारावीचा निकाल लागावा यासाठी बोर्ड नियोजन करते. निकाल वेळेत लागल्यास प्रवेशप्रक्रिया पार पडून सर्व कॉलेजांचे वर्ग ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान सुरू होतात. पण निकाल लांबल्यास कॉलेजांचे वेळापत्रकही कोलमडण्याचा धोका असतो.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.