शपथविधी सोहळ्यादरम्यान राज्यपाल कोश्यारी भडकले, पाहा काय घडलं! 

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 30, 2019 | 15:04 IST

Governor Bhagat Singh Koshyari: महाविकास आघाडी सरकारच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यादरम्यान राज्यपाल कोश्यारी हे संतापलेले दिसले. जाणून घ्या इथं नेमकं काय घडलं. 

during the swearing in ceremony the governor was angry look what happened 
शपथविधी सोहळ्यादरम्यान राज्यपाल कोश्यारी भडकले, पाहा काय घडलं!   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शपथविधी सोहळ्यादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भडकले
  • कॅबिनेट मंत्री केसी पाडवी यांना पुन्हा घ्यायला लावली मंत्रिपदाची शपथ
  • शपथविधी सोहळ्यात ३६ मंत्र्यांनी घेतली शपथ

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज (३० डिसेंबर) पार पडला. साधारण महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, त्यावेळी झालेल्या एकूणच शपथविधीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रचंड नाराज असल्याचं समोर आलं होतं. कारण त्यावेळेस झालेला शपथविधी हा राज्यघटनेला धरुन झाला नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. याच मुद्द्यावरुन भाजप नेत्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ देखील केला होता. त्यामुळे आजचा शपथविधी घटनेप्रमाणेच व्हावा यासाठी राज्यपाल कोश्यारी आग्रही असल्याचे दिसून आले. पण याच शपथविधी सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी हे फारच संतापलेले पाहायला मिळाले. 

त्याचं झालं असं की, काँग्रेसचे आमदार केसी पाडवी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर तात्काळ एक छोटेखानी मनोगत सुरु केलं. यावेळी राज्यपालांनी त्यांना रोखण्याचा दोन ते तीन वेळा प्रयत्न केला. पण तरीही पाडवी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंच. या सगळ्या प्रकारामुळे राज्यपाल कोश्यारी हे खूपच संतापले. यावेळी त्यांनी केसी पाडवी यांना तिथेच सुनावलं. 'हे असं भाषण करता येत नाही. त्यामुळे तुम्ही पुन्हा शपथ घ्या. इथे खाली शरद पवार, खर्गे साहेब आणि सीनियर बसले आहेत त्यांना विचारा तुम्ही. पुन्हा शपथ घ्या.' असं म्हणत कोश्यारी यांनी पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. राज्यपालांनी सांगितल्यानंतर केसी पाडवी यांनी काहीशा नाराजीनेच पुन्हा पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, आता या गोष्टीवरुन पुन्हा नवं राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. 

'उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा बेकायदेशीर होता, रद्द व्हावा', चंद्रकांत पाटलांची मागणी  

'उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी घेतलेली शपथ ही बेकायदेशीर आहे. खरं तर शपथविधी हा प्रोटोकॉलनुसार झालं पाहिजे. पण या सर्वांनी शपथ ग्रहणाच्या आधी काही नावं घेतली. राज्यपालांनी त्यांना चार-चार वेळा टोकलं. आमच्या त्यांच्या नाव घेण्याला विरोध नाही. आमच्या मनात बाळासाहेबांविषयी आदरच आहे. ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी देखील आमच्या मनात आदर आहे. पण तसं असलं तरीही शपथ ही शपथ असते. प्रोटोकॉलनुसार शपथ ही  एका चौकटीत राहूनच घेतली गेली पाहिजे असा नियम आहे. पण तसं झालं नाही. त्यामुळे हा संपूर्ण शपथविधीच रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.' अशी टीका सुरुवातीच्या शपथविधी सोहळ्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. 

'शिवाजी महाराज आणि फुले-शाहू-आंबेडकरांबाबत फडणवीसांच्या मनात असूया', जयंत पाटलांचा गंभीर आरोप 

दरम्यान, याच गोष्टीवरुन जेव्हा भाजप नेत्यांनी विधीमंडळात गदारोळ केला होता तेव्हा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला उत्तर देताना अत्यंत गंभीर आरोप केले होते. 

'आमच्या मंत्र्यांनी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. तर यांना एवढा त्रास का झाला? शाहू, फुले, आंबेडकर  यांची नावं घेतली तर यांना राग का आला? यांना राग आला कारण की यांना त्यांच्याविषयी असूया वाटते, ही असूया त्यांच्या मनात वर्षानुवर्ष आहे. पिढ्यान पिढ्या त्यांच्या मनात याविषयी राग आहे. जो आज त्यांच्याकडून बाहेर आला.' असं म्हणत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी