ED file supplementary chargesheet against Anil Deshmukh : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात इडीने बुधवार २९ डिसेंबर २०२१ रोजी सात हजारपेक्षा जास्त पानांचे पुरवणी आरोपपत्र विशेष PMLA कोर्टात दाखल केले. यात अनिल देशमुख, त्यांची दोन्ही मुलं, अनिल देशमुखांचा सीए या सर्वांना आरोपी केले आहे. यामुळे अनिल देशमुख, हृषिकेश अनिल देशमुख, सलिल अनिल देशमुख आणि देशमुखांचे सीए भाविक पंजनानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलांवर ५० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग अर्थात पैशांच्या अफरातफरी प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. देशमुख कुटुंब पैशांची अफरातफर करण्यासाठी कागदोपत्री तयार केलेल्या २७ कंपन्यांचा वापर करत आहे; असेही आरोपपत्रात नमूद आहे.
आरोपपत्रात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची साक्ष नोंदविलेली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार केले आहेत. या व्यवहारांबाबतच्या प्रश्नांना अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही; असे इडीचे म्हणणे आहे.
बारा आयपीएस अधिकाऱ्यांची त्यांच्या इच्छेनुसार बदली झाली आहे. या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात आहे. या बदल्यांमुळे पैशांची अफरातफर करणे सोपे झाले; असे इडीचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील महाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांची भूमिका संशयास्पद आहे; असे इडीचे म्हणणे आहे. मात्र या बाबतीत आरोपपत्रात सविस्तर माहिती दिसत नाही. यामुळे आणखी एखादे पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची अथवा एखाद्या आरोपी विरोधात स्वतंत्र आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक झाली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात तक्रार नोंदवून घेतली. पुढे आर्थिक अफरातफर असल्याचे लक्षात आल्यामुळे इडीचे पथक तपासात सहभागी झाले. इडीने अनिल देशमुख यांची सुमारे बारा तास चौकशी केली आणि त्यांना अटक केली. अटकेची कारवाई २ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री उशिरा झाली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.