Maharashtra Board Exams: उत्सुकता दहावी, बारावी निकालांची; शिक्षण मंडळ काय सांगते?

मुंबई
Updated May 20, 2019 | 21:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra Board Exams: शिक्षण तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ किंवा २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या तारखाही बोर्डाच्या आधीच्या निकालांच्या तारखांवरून अंदाजे काढल्या आहेत.

SSC HSC result
दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखेचा सस्पेन्स   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दहावी, बारावी निकालांबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही
  • बारावीचा निकाल २७ किंवा २८ मे रोजी शक्य
  • दहावीच्या निकालाबाबतही मंडळाकडून अद्याप सस्पेंन्स

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या निकालांची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. देशभरात आयसीएससी आणि सीबीएससी पॅटर्नच्या दहावी आणि बारावी परिक्षांचे निकाल लागले आहेत. आता केवळ महाराष्ट्रातील राज्य बोर्डाचे निकाल राहिल्यानं उत्सुकता वाढली आहे. दोन्ही परिक्षांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची चिन्हे आहेत. मात्र, शिक्षण मंडळाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

वेबसाईटवर कळणार निकालाची तारीख

राज्यातील यापूर्वीच्या निकालांची परंपरा पाहिली तर बारावीचा निकाल या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. पण, २१ मे उजाडला तरीही महामंडळाकडून बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तारीख जाहीर झाल्यानंतर mahresults.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहेत. या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, हे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आधी निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता असल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले आहे. या संदर्भात तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २७ किंवा २८ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्थात या तारखाही बोर्डाच्या आधीच्या निकालांच्या तारखांवरून अंदाजेच काढण्यात आलेल्या आहेत. निकालाची अधिकृत तारीख जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in ही वेबसाईट पाहावी, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. त्या वेबसाईटवरच निकालाच्या तारखेची घोषणा होणार आहे.

निकालानंतरच पुरणी परिक्षेचे वेळापत्रक

बारावी बरोबरच महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाच्या दहावीच्या निकालाची ही विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे. सर्वसाधारणपणे दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर आठवडाभरात जाहीर केला जातो. पण, विद्यार्थ्यांना या निकालाच्या तारखेसाठी ही mahresult.nic.in या वेबसाईटलाच भेट द्यावी लागणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर जुलै २०१९मध्ये नापास मुलांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच जे विद्यार्थी मार्च २०१९च्या परीक्षेसाठी अपात्र ठरले आहेत. त्यांना देखील जुलैमध्ये पुरवणी परीक्षा देता येणार आहे, अस शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक निकालानंतरच जाहीर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी