Eknath Shinde rebell Raj Thackeray Old Video Viral : मुंबई : ऑक्टोबर २०१७ मध्ये मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेने मनसे फोडली. या घटनेनंतर अस्वस्थ झालेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 'वेळ प्रत्येकाची येते' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे शिवसेनेत भूकंप झाला आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी दोन तृतियांश आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी झाली आहे. यानंतर सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 'वेळ प्रत्येकाची येते' असे वक्तव्य असलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ऑक्टोबर २०१७च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले. या निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या जागांपेक्षा दहा जास्तीच्या जागा शिवसेना जिंकली होती. पण दोन्ही पक्षांकडे महापौर निवडण्यासाठी स्पष्ट बहुमत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहील असे जाहीर केले. यानंतर शिवसेनेने महापौर आणि उपमहापौर निवडले. पण पालिकेच्या राजकारणात दीर्घकाळ त्रिशंकू स्थिती राहिली तर राजकीयदृष्ट्या धोक्याचे ठरेल असा विचार करून शिवसेनेने मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक फोडले आणि स्वतःचे संख्याबळ वाढवले. राजकीय स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज ठाकरेंची मनसे फोडली होती. यानंतर राज यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण आता उद्धव ठाकरे यांनाच होत असेल अशी चर्चा सोशल मीडियात सुरू आहे.
शिवसेनेने मनसे फोडल्यानंतर राज ठाकरे नाराज झाले होते. 'मी शिवसेनेतून ज्या वेळेला बाहेर पडलो, त्यावेळी सुद्धा मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. हे उद्धव वगैरे आहेत ना त्यांच्या या नीच राजकारणाचा मला कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर पडलो. मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार, नगरसेवक माझ्यासोबत बाहेर पडायला तयार होते, पण तेव्हा मी सांगितलं होतं, की मला पक्ष फोडून माझा पक्ष उभारायचा नाही. या गोष्टी मला करायच्या नाहीत, मी करणारही नाही. पक्ष स्थापनेच्या वेळीही, कोणालाही विचारुन बघा, मी एकालाही फोनही केला नव्हता. त्यानंतर मी बाहेर पडल्यावर जे प्रेमाने येतील, ते माझ्यासोबत राहतील. त्यामुळे असलं घाणेरडं राजकारण मी कधी केलं नाही, करणारही नाही;' असे राज ठाकरे म्हणाले होते.
'आजपर्यंत या लोकांना मी अनेक वेळा मदत करत आलो. पण हे असलं राजकारण बाळासाहेबांनी कधी शिकवलं नाही. बाळासाहेब जसे वागायचे, त्यांनी जे शिकवलं ते मी आत्मसात केलं आहे, उद्धव आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून अत्यंत नीच अशी खेळी खेळली गेली. महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही, आणि मी हे कधीच विसरणार नाही. आणि मी विसरलेलो नाही, हे त्यांना भविष्यात कळेल;' असेही राज ठाकरे म्हणाले होते. आता राज यांची ही वक्तव्ये सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.