मुंबई : शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत आमदारांचा एक गट घेऊन गेले. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) विश्वासू, शिवसेनेचे विधीमंडळ पक्षनेते असलेले एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या गोटात विविध चर्चा सुरू झाल्या. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवसेनेचे आमदार एकदम सहजासहजी मुंबईतून शिंदेंच्या गटात सहभागी होत असल्याने काही प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यातच सोशल मीडियातही एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांमुळे भाजपसोबत जुळवून घेण्याची भाषा सुरू केली आहे का ? असाही सवाल उपस्थित होत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर ईडी, आयटीकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळेच शिवसेनेचे ओवळा-माजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा भाजप सोबत जुळवून घेण्याचं म्हटलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे यांनीही आता भाजपसोबत युतीचा हट्ट केला आहे का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे आणि त्यामागे कारण आहे ते सोशल मीडियात एका वृत्तपत्राचं व्हायरल होत असलेलं कात्रण आहे.
सोशल मीडियात एक वृत्तपत्राचं कात्रण व्हायरल होत आहे. ज्यात म्हटलं आहे, "सचिन जोशी कुठे आहेत? एकनाथ शिंदे यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे त्यांचे सचिव सचिन जोशी यांना दहा दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आली होती. ही नोटीस आल्यापासून सचिन जोशी कुठे आहेत? आणि त्यांना बजावलेल्या ईडीच्या नोटीशीच्या एकनाथ शिंदेंच्या बंडाशी काय संबंध आहे? याची चर्चा रंगली आहे".
वरील मथळ्याचं एक पेपर कटिंग सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, हे वृत्त नेमक्या कुठल्या वृत्तपत्रातील आङे याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये.
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसादही मिळताना दिसत आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतच एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावाही शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारही अडचणीत आले आहे. धर्मवीर सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही दिवसांपासून सचिन जोशी हे संपर्कात नसल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर काही दिवसांनी एकनाथ शिंदेंचं बंड पुकारलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे सचिन जोशी हेच सर्व व्यूहरचना आखत होते का? असाही सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.