एकनाथ शिंदे करणार विठ्ठलाची महापूजा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 01, 2022 | 10:19 IST

Eknath Shinde Will Perform Vitthal Mahapuja : दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे होणारी महापूजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात. यंदा हा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.

Eknath Shinde Will Perform Vitthal Mahapuja
एकनाथ शिंदे करणार विठ्ठलाची महापूजा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे करणार विठ्ठलाची महापूजा
  • शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा ही शासकीय पूजा असल्याचे जाहीर केले
  • शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा शासकीय पूजेचा मान मिळाला

Eknath Shinde Will Perform Vitthal Mahapuja : दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे होणारी महापूजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात. यंदा हा मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.

शिवसेनेचे आमदार आणि इतर आमदार अशा ५० आमदारांना सोबत घेऊन केलेले बंड यशस्वी झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. गुरुवार ३० जून २०२२ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे आषाढी एकादशीला महापूजेचा मान एकनाथ शिंदे यांनाच मिळणार हे स्पष्ट आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आहे तीच खरी शिवसेना असे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे आहे. यामुळे यंदा विठ्ठलाची महापूजा करण्याची संधी शिवसेनेच्या आमदाराला मिळणार हे स्पष्ट आहे. 

इंग्रजांच्या काळात विठ्ठलाच्या महापूजेची परंपरा होती. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करत होते. महापूजेसाठी विठ्ठल मंदिराला ब्रिटिशांकडून दोन हजार रुपयांचे वार्षिक अनुदानही दिले जात असे. याआधी १८४० मध्ये विठ्ठलाच्या महापूजेचा मान सातारच्या गादीला मिळाला. पेशवाईत थोरले बाजीराव पेशवे यांनी विठ्ठलाची देवस्थान समिती स्थापन केली. ही समितीचे पुढे विठ्ठलाची महापूजा करत होती. 

संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आल्यानंतर मंत्र्यांनी महापूजा करायला सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्त्वात आल्यानंतर महसूलमंत्री राजारामबापू पाटील यांनी आषाढी एकादशीची पहिली महापूजा केली. १९६३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्री असताना, तर १९७७ मध्ये वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना ही महापूजा केली. शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा ही शासकीय पूजा असल्याचे जाहीर केले. नंतर राज्याचे मुख्यमंत्री महापूजा करणार अशी परंपरा निर्माण झाली. 

सर्वाधिक वेळा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान काँग्रेसच्या विलाराव देशमुख यांना मिळाला. त्यांनी सहा वेळा विठ्ठलाची महापूजा केली. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी चार वेळा हा मान मिळविला. 

मागची दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होत नव्हती. वारकऱ्यांच्या अनुपस्थितीत विठ्ठलाची महापूजा होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत ही शासकीय महापूजा करत होते. यंदा वारकरी पंढरपूरमध्ये येत आहेत आणि विठ्ठलाच्या महापूजेची संधी एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. 

याआधी १९७० मध्ये बाबा आढाव यांच्या नेतृत्वात धर्मनिरपेक्षतेसाठी आंदोलन झाले. यामुळे १९७१मध्ये विठ्ठलाच्या महापूजेला मुख्यमंत्री अनुपस्थित होते. पण १९७२ मध्ये मोठा दुष्काळ पडला. यानंतर 
महाराष्ट्र सरकारने १९७३ मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ताब्यात घेतले आणि मंदिरासाठी विशेष कायदा केला. कायदा केल्यानंतर मंदिरासाठी देवस्थान समिती स्थापन झाली. या समितीच्या सदस्यांनी १९७३, १९७४, १९७५ अशी तीन वर्ष आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा केली. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७६ मध्ये विठ्ठलाची महापूजा केली आणि तिथून पुढे पुन्हा मुख्यमंत्र्यांनी महापूजा करण्यास सुरुवात झाली. वसंतदादा पाटील, शरद पवार यांनीही महापूजा केली. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी दोन वेळा शासकीय पूजा केली.

मुंबईत १९९६ मध्ये रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार झाला होता. दलित संघटनांनी मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची पूजा करू नये म्हणून आंदोलन केले. अखेर १९९६ मध्ये मुख्यमंत्र्यांना महापूजा करता आली नव्हती. हा अपवाद वगळता दरवर्षीच मुख्यमंत्री आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा करत आहेत. आता नगरसेवक ते मुख्यमंत्री, सामान्य रिक्षावाला ते राज्याचा प्रमुख असा प्रवास केलेले एकनाथ शिंदे सामान्य वारकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी