Rajya Sabha Elections 2022 | निवडणूक आयोगाने भाजपला साथ दिल्यामुळेच त्यांचा तिसरा उमेदवार विजयी होऊ शकला, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा कोण जिंकणार, याबाबत कमालीची उत्सुकता होती. अखेर भाजपनं ही जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. मात्र निवडणूक आयोगाने साथ दिल्यामुळे आणि मदत केल्यामुळेच हे घडू शकलं, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीकडून परस्परांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. निवडणुकीचे नियम मोडल्याच्या आणि क्रॉस व्होटिंगच्या या तक्रारी होत्या. दोन्ही बाजूंनी आपल्या विरोधातील आक्षेपार्ह वर्तन केलेल्या आमदारांची मतं रद्द करावीत, अशी मागणी केली होती. दरम्यान, शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत अपात्र ठरवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि हे मत ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी सूचना मतमोजणी अधिकाऱ्यांना केली. पराभवाच्या भितीमुळे भाजपच्या सूचनेवरूनच मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आणि लांबवण्यात आली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.
अधिक वाचा - शिवसेना ही "ढ"टीम, मनसेच्या संदीप देशपांडेंचे ट्वीट
महाविकास आघाडी स्वबळावर तीन उमेदवार आणि भाजप स्वबळावर दोन उमेदवार निवडून आणू शकतो, हे जाहीर होतं. मात्र सहावा उमेदवार कोण निवडून येणार याची चुरस होती. अगोदर, छत्रपती संभाजीराजे यांना सर्वसहमतीचा सहावा उमेदवार म्हणून निवडणुकीला उभं करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र शिवसेनेनं आपल्या पक्षात राजेंनी प्रवेश करावा आणि निवडणूक लढवावी, अशी अट घातली होती. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात भाजपने कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवून चुरस वाढवली होती. अपक्षांची मतं आपल्या बाजूनं वळवणे आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची बेगमी करणे या जोरावर तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपने व्यूहरचना केली होती.
भाजपचा तिसरा उमेदवार जिंकला असला, तरी हा विजय म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार करता संजय पवार हेच आघाडीवर होते. मात्र दुसऱ्या मतांच्या जोरावर त्यांचा विजय झाल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या एका आमदाराचं मत अपात्र ठरवलं, मात्र आम्ही ज्यांच्यावर आक्षेप नोंदवला होता, त्यांच्यावर मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, असा आरोपही राऊत यांनी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानेच भाजपचा तिसरा उमेदवार या निवडणुकीत विजयी झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
अधिक वाचा - Rajyasabha Elections 2022, Maharashtra : भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी, शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव
गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजपला सत्तेवर बसण्याचा कौल दिला होता. मात्र आमच्या पाठीत आमच्याच मित्राने चाकू खुपसल्याने हे होऊ शकलं नाही. महाविकास आघाडीकडून वारंवार ‘घोडेबाजार’ असा शब्द वापरण्यात आल्यामुळे अनेक आमदार नाराज झाले आणि स्वतःला घोडा म्हटल्याचा राग त्यांनी मतदानातून व्यक्त केला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शिवसेनेचे पहिले उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षाही आमचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना जास्त मतं मिळाल्याचा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.