महाराष्ट्रात लवकरच निवडणुका जाहीर होणार, वाझेचे वारे जोरात वाहणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 05, 2022 | 11:23 IST

निवडणुकीचे वेळापत्रक एका आठवड्याच्या आत जाहीर करावे; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश ज्या दिवशी दिले त्याच दिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सचिन वाझे, मनसुख हिरेन या नावांची चर्चा सुरू झाली.

Sachin Vaze
महाराष्ट्रात लवकरच निवडणुका जाहीर होणार, वाझेचे वारे जोरात वाहणार 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात लवकरच निवडणुका जाहीर होणार, वाझेचे वारे जोरात वाहणार
  • मनसुख हिरेन याच्या हत्येच्या कटात प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे या दोघांचाही हात
  • हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याची माहिती पुढे आली

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ओबीसींविषयीची ताजी माहिती संकलित करून सर्वोच्च न्यायालयात सादर केली नसल्यामुळे महाराष्ट्रातले ओबीसींचे राजकीय आरक्षण रखडले आहे. पण या रखडलेल्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करून निवडणुका लांबणीवर टाकू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने सुनावले. राज्यात चौदा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका मार्च २०२०च्या जुन्या प्रभाग रचनेनुसार घ्याव्या आणि निवडणुकीचे वेळापत्रक एका आठवड्याच्या आत जाहीर करावे; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश ज्या दिवशी दिले त्याच दिवशी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सचिन वाझे, मनसुख हिरेन या नावांची चर्चा सुरू झाली. यासाठी निमित्त ठरले मुंबईच्या हायकोर्टातील सुनावणीचे.

एनआयएने मुंबईच्या हायकोर्टात दिलेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन याच्या हत्येच्या कटात प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे या दोघांचाही हात होता. या कोर्टापुढे आलेल्या माहितीमुळे पुन्हा एकदा वाझे नावाचे वारे महाराष्ट्रात घोंगावू लागले आहेत. 

राज्यात लवकरच मुंबई आणि ठाण्यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्याचा निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. हा कार्यक्रम जाहीर होण्याच्या सुमारास वाझे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

भाजपचे केशव उपाध्ये यांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे प्रकरणावरून थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाव न घेता जाब विचारला आहे. सचिन वाझेवर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे आणि मनसुख हिरेनची हत्या करणे तसेच खंडणी वसुली करणे असे गंभीर आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिन वाझे हा काही लादेन नाही, असे वक्तव्य केले होते. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे दोघेही काही काळ शिवसेनेत सक्रीय होते. यामुळे भाजपने थेट हल्ला चढवला आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याची माहिती पुढे आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचा शोध घेतला पाहिजे असेही भाजपचे केशव उपाध्ये म्हणाले. दोन पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आलं पाहिजे, असेही केशव उपाध्ये म्हणाले. शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का; असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी