मराठीतून शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा वाढणार पैसा; पालिका कर्मचाऱ्यांना २ अतिरिक्त वेतनवाढ!

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 19, 2021 | 08:23 IST

मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

2 additional pay hikes for municipal employees
मराठी भाषेमुळे महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मुंबई महानगरपालिका सेवेतील १ हजार ४८९ कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ
  • मराठीत एमए करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ.
  • नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई: मराठी भाषेतून शिक्षण पूर्ण करण्याला इतकं महत्त्व नाही असं नेहमी म्हटलं जातं. नोकरी मिळवायची किंवा पगारात वाढ हवी तर इंग्रजी भाषेतून पदवी- पदवीत्तुर शिक्षण घेतलं पाहिजे, अशी धारणा प्रत्येकाची झाली आहे. पण याला मोडीत काढत मुंबई महापालिकेने मराठीतून शिक्षण घेणाऱ्यांचं दोन अतिरिक्त पगारवाढ केली आहे. नुकताच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शासनाने याबाबत परिपत्रक काढले असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर झाला पाहिजे, त्याचप्रमाणे महापालिकेचे सर्व व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावे. मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मराठी भाषा विषयामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केला होता.

मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी २०१५ पासून पुढे बंद होती. त्यामुळे त्यानंतर पदवी मिळवणारे पालिका कर्मचारी या वेतनवाढीपासून वंचित होते. 
या निर्णयाची अंमलबजावणी २०१६ ते २०१८ पर्यंत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देखील, मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी याबाबत निर्देशित केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेऊन तातडीने बैठक बोलावली. त्यानंतर या प्रश्नाचा आढावा घेऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला. त्याचा फायदा मुंबई महानगरपालिका सेवेतील जवळपास १ हजार ४८९ कर्मचाऱ्यांना होणार आहे. पालिकेच्या तिजोरीवर या अतिरिक्त वेतनवाढीपोटी ५२ लाख ६३ हजार रुपयांचा भार पडणार आहे.

या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता कर्मचाऱ्यांनी आपला वेळ आणि पैसा खर्च केला असून, काम आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आहे, त्यामुळे माय मराठीसाठी महापालिकेचा ठराव क्रमांक ११६५ ची अंमलबजावणी करण्यात यायलाच हवी, अशी भूमिका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. या विषयावर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी या विषयाची तपासणी करून आठ दिवसात महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी