मुंबई मेट्रोवरून श्रेयवादाची लढाई, भाजपचे 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय' बॅनर शहरात झळकले

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 01, 2022 | 23:17 IST

मुंबईत मेट्रोचे दोन नवे मार्ग शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटनाच्या आधीच श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

Even before the inauguration of Metro, BJP has put up banners in the city and criticized Shiv Sena and CM Uddhav Thackeray
मुंबई मेट्रोवरून श्रेयवादाची लढाई, भाजपचे 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय' बॅनर शहरात झळकले 
थोडं पण कामाचं
  • मुंबई मेट्रोवरून श्रेयवादाची लढाई, भाजपचे 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय' बॅनर शहरात झळकले
  • पहिल्या टप्प्यात मेट्रोच्या दोन्ही मार्गांवरून नऊ स्टेशनवरून प्रत्येकी नऊ किलोमीटरचा प्रवास करता येणार
  • बेस्ट बसचे तिकीट पाच रुपये तर मेट्रोचे तिकीट दहा रुपये

Even before the inauguration of Metro, BJP has put up banners in the city and criticized Shiv Sena and CM Uddhav Thackeray : मुंबई : मुंबईत मेट्रोचे दोन नवे मार्ग शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटनाच्या आधीच श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय... धन्यवाद देवेंद्रजी' असे बॅनर संपूर्ण मुंबईत झळकले आहेत.

भाजपने लावलेल्या बॅनरमध्ये फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या निधीचा आणि प्रकल्पाच्या लांबीचा (किलोमीटर मार्ग) स्पष्ट उल्लेख आहे. बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे फोटो आहेत. 

विशेष म्हणजे 'काम केलंय, मुंबईनं पाहिलंय... धन्यवाद देवेंद्रजी' असे भाजपचे बॅनर वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे वर वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात लागले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला वांद्रे येथेच आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून मेट्रोवरून भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

जे मेट्रो मार्ग सुरू होत आहेत त्यांच्याशी संबंधित निधी आणि वेगवेगळ्या मंजुरींचे निर्णय फडणवीस सरकारच्या काळात झाले आहेत. हे प्रकल्प एमएमआरडीए करत आहे. प्रकल्पाशी संबंधित अनेक निर्णय झाले त्यावेळी फडणवीस एमएमआरडीएचे मुख्यमंत्री या नात्याने अध्यक्ष होते. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर शपथ घेतल्यापासून वर्ष दीड वर्षात या मेट्रोचे उद्घाटन त्यांनीच केले असते असे भाजपचे म्हणणे आहे. 

कोरोना संकट आणि ठाकरे सरकारने काही निर्णयांची समीक्षा करण्यासाठी वेळ घालवल्यामुळे मेट्रो प्रकल्पांची पूर्तता होण्यास वेळ लागला असा आरोप भाजपने केला आहे. तर प्रकल्प आमच्या काळात पूर्ण झाला आहे त्यामुळे त्याचे उद्घाटन आणि श्रेय हे अर्थातच विद्यमान ठाकरे सरकारचे आहे; असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मेट्रोच्या दोन मार्गांचे होणार उद्घाटन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन करणार आहेत. यामुळे मुंबईतील मेट्रो मार्गांची संख्या तीन होणार आहे. सध्या मुंबईत अनिल अंबानी यांची कंपनी वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर मेट्रो सेवा चालवते. ज्या मेट्रो मार्गांचे उद्घाटन होत आहे त्यापैकी एक मार्ग हा दहिसर पश्चिम ते डहाणूकर वाडी मेट्रो २ अ असा आहे. तसेच आरे ते दहिसर पूर्व असा मेट्रो ७ क्रमांकाचा मार्गही सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही मार्गांवरून नऊ स्टेशनवरून प्रत्येकी नऊ किलोमीटरचा प्रवास मुंबईकर करू शकतील.

वर्सोवा ते घाटकोपर या ११.४० किमीच्या एकेरी प्रवासाकरिता अंबानी यांची कंपनी चाळीस रुपये आकारते. तर नव्याने सुरू होत असलेल्या दोन्ही मेट्रो मार्गांवर शून्य ते तीन किलोमीटरसाठी एकेरी प्रवासाकरिता दहा रुपये आणि त्यापुढील अंतरासाठी एकेरी प्रवासाकरिता वीस रुपये आकारले जातील.

बेस्ट बसचे तिकीट पाच रुपये तर मेट्रोचे तिकीट दहा रुपये

मुंबईत सेवा देणाऱ्या 'बेस्ट'च्या साध्या बसचे शून्य ते पाच किमी अंतराचे भाडे पाच रुपये, पाच ते दहा किमी अंतराचे भाडे दहा रुपये, दहा ते पंधरा किमी अंतराचे भाडे पंधरा रुपये आणि पंधरा किमी पेक्षा जास्त अंतराचे भाडे वीस रुपये आहे. याउलट एसी आणि आरामदायी प्रवासी सोय उपलब्ध करून देणाऱ्या मेट्रोच्या दोन नव्या मार्गांवर शून्य ते तीन किमी अंतरासाठी दहा रुपये आणि त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वीस रुपये आकारले जातील. ही व्यवस्था गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होत असलेल्या नऊ-नऊ किमी अंतराच्या दोन नव्या मेट्रो मार्गांसाठी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी