Ajit Pawar : राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तरी ते नेतृत्वाच्या अधिक जवळ जातात-  अजित पवार

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुठल्याही पक्षात गेले तरी ते नेतृत्वाच्या अधिक जवळ जातात असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. तसेच भाजपमधील जुन्या जाणत्या नेत्यांना जमले नाही, ते राहुल नार्वेकर यांनी तीन वर्षात करुन दाखवले असेही पवार म्हणाले.

ajit pawar
अजित पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुठल्याही पक्षात गेले तरी ते नेतृत्वाच्या अधिक जवळ जातात
  • भाजपमधील जुन्या जाणत्या नेत्यांना जमले नाही, ते राहुल नार्वेकर यांनी तीन वर्षात करुन दाखवले
  • सर्व सदस्यांना न्याय मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाची चाकं गतीमान होतील

Ajit Pawar : मुंबई : विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुठल्याही पक्षात गेले तरी ते नेतृत्वाच्या अधिक जवळ जातात असे विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. तसेच भाजपमधील जुन्या जाणत्या नेत्यांना जमले नाही, ते राहुल नार्वेकर यांनी तीन वर्षात करुन दाखवले असेही पवार म्हणाले.

विधीमंडळात आज राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदपर भाषण केले. पवार म्हणाले की, आमचे मित्र आणि एकेकाळचे सहकारी  राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदाला गौरवशाली परंपरा आहे. आतापर्यंतच्या सर्वच अध्यक्षांनी या पदाला न्याय दिल्याचे आपण पाहिले आहे. नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे अतिशय चांगले काम होईल. सर्व सदस्यांना न्याय मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाची चाकं गतीमान होतील, अशी आमची आणि जनतेची अपेक्षा आहे असे पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांचे नाव जोडले गेले आहे. हा खूप मोठा सन्मान आणि गौरव आहे. तितकीच मोठी जबाबदारी देखील आहे. महाराष्ट्र अध्यक्षपदाच्या नावावर नजर टाकली तर अनेक दिग्गजांनी हे पद भुषविले आहे. माजी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील, हरिभाऊ बागडे, नाना पटोले आज विधानसभेत आहेत. मधल्या काळात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सव्वा वर्ष प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आदिवासी समाजाचा सुपुत्र झिरवळ यांनी देखील चांगल्या प्रकारे या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज सभागृहात हजर असलेल्या सर्वच माजी अध्यक्ष आणि नरहरी झिरवळ साहेबांचे अभिनंदन व्यक्त करुन त्यांना धन्यवाद देतो असे पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, राजकीय जीवनात चढउतार असतात, हे सर्वांनीच पाहिले आहे. एकंदरीत या सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालले पाहिजे. सभागृहातील सदस्यांना न्याय देत, अभ्यासपूर्ण चर्चांना वाव दिला पाहीजे. राज्याचा विकासाचा गाडा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा प्रयत्न सर्वच अध्यक्षांनी केलेला आहे. मा. नार्वेकरजी आपल्याकडूनही हीच अपेक्षा आहे. नार्वेकर यांच्या रुपाने अभ्यासू नेतृत्व सभागृहाला मिळाले आहे. माझ्या माहितीप्रमाणे नार्वेकर यांनी विधानपरिषदेचे सभागृह सहा वर्षांसाठी पाहिले आहे. या टर्ममध्ये तुम्ही विधानसभेत आला आहात. त्यामुळे दोन्ही सभागृहाचा तुम्हाला जवळून अभ्यास आहे. आपले आणि माझे अनेक वर्षांपासून संबंध आहेत असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तीनही भाषांवर आपले प्रभुत्व आहे अशी माहिती पवार यांनी दिली. सयंमी अशाप्रकारचे आपले नेतृत्व आहे. नार्वेकर पुर्वी शिवसेनेत होते. त्यावेळेस मला कानावर आले होते की, ते आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी होते. आदित्य ठाकरेंना तुम्ही कायद्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्हाला मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार हवा होता. त्यामुळे आम्ही तुम्हाला उमेदवारीसाठी प्रस्ताव दिला आणि तुम्ही देखील हा प्रस्ताव स्वीकारला. मात्र दुर्दैवाने मोदी लाट असल्यामुळे अनेक मोठ मोठे उमेदवार पराभूत झाले. त्यात आमचे उमेदवार नार्वेकर यांचाही पराभव झाला. लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेवर संधी दिली. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, राष्ट्रवादीचेही प्रवक्ते म्हणून चांगले काम केले. यापुढे अध्यक्ष म्हणून आपण चांगले काम कराल, याबाबत मला शंका नाही असेही पवार यांनी सांगितले.  

पवार म्हणाले की, राहुल नार्वेकर कुठल्याही पक्षात गेले तरी ते नेतृत्वाच्या अधिक जवळ जातात. भाजपमधील जुन्या जाणत्या नेत्यांना जमले नाही, ते राहुल नार्वेकर यांनी तीन वर्षात करुन दाखवले, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. सन्माननीय नार्वेकर यांना संसदीय कायद्याची उत्तम जाण आहे. तसेच ते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर खऱ्या अर्थाने कायद्याची जाण असलेले अध्यक्ष आपल्याला मिळाले आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून कायद्याचे पालन करत असताना दोन्ही बाजुंच्या सदस्याना संधी दिली पाहीजे, अशी अपेक्षा सर्व सदस्यांच्या वतीने व्यक्त करतो असेही पवार यांनी नमूद केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी