शरद पवार मुलाखत भाग (२): अन्य राजकीय पक्षाध्यक्षाची सामनाने प्रथमच घेतली मुलाखत

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 12, 2020 | 19:25 IST

Sharad Pawar interview part 2: सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रक्षेपित झाला. पाहा पवार नेमकं काय म्हणतायेत:

sharad pawar interview
शरद पवार यांची मुलाखत  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • शरद पवार यांची विशेष मुलाखत सुरु
  • पाहा शरद पवार नेमकं म्हणतायेत
  • संजय राऊत यांनी घेतली पवारांची विशेष मुलाखत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांची मॅरेथॉन मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली आहे. याच मुलाखतीचा दुसरा भाग आज (१२ जुलै) प्रक्षेपित करण्यात आला आहे. (Interview Part 2) कालच्या भागात शरद पवारांनी भाजपवर विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.  'मी पुन्हा येईन' असे म्हणण्यातून सत्तेचा दर्प दिसला आणि यांना धडा शिकवला पाहिजे, हा विचार लोकांमध्ये पसरला.' असे सांगत शरद पवारांनी नाव न घेता फडणवीसांना टोला हाणला होता. दरम्यान, आजच्या भागात पवारांनी देशाची आर्थिक स्थिती आणि चीनसंबंधी प्रश्नांवर उत्तरं दिली. आतापर्यंत सामना वृत्तपत्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती येत होत्या. मात्र, सामना वृत्तपत्राने इतर राजकीय पक्षाध्यक्षाची म्हणजेच शरद पवारांची घेतलेली ही पहिलीच मुलाखत आहे.

पाहा शरद पवार यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग: 

शरद पवार यांच्या सामनातील आजच्या मुलाखतीतील चीनविषयी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे: 

चीन हे आपल्या देशाच्या दृष्टीने मोठं संकट आहे.

आजच्या भागात शरद पवारांनी चीनबाबतच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. पाकिस्तानपेक्षा देखील चीनच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. माझा या सगळय़ा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपण या देशात अनेक वर्षे आपला मित्र कोण, शत्रू कोण याचा ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी भारतीय मनात शत्रू म्हणून पहिल्यांदा पाकिस्तान येतं. पण माझं अनेक वर्षांपासून मत आहे, पाकिस्तानपासून खरी चिंता आपल्याला नाही. पाकिस्तान आपल्या विचारांचा नाही ही गोष्ट खरी. पाकिस्तान आपल्या हिताच्या विरोधात पावलं टाकतो हेही खरं, पण लाँग टर्मच्या दृष्टीने आपल्या सगळय़ांच्या हिताबाबत खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. चीन हे आपल्या देशाच्या दृष्टीने मोठं संकट आहे. चीनपासून आपल्याला होणारा उपद्रव हा साधासुधा नाही.

'चीनची लष्करी शक्ती तुलनेने मोठी आहे'

पाकिस्तानची लष्करी शक्ती आणि चीनची लष्करी शक्ती यांच्यात जमीन-आस्मानचा फरक आहे. आज आपली लष्करी शक्ती, आपलं हवाई दल, आपलं नाविक दल, आपलं सैन्यदल, आपली शस्त्रास्त्र-स्फोटकं यांची चीनशी तुलना केली तर कदाचित दहाला एक असं प्रमाण पडू शकेल. आपल्यापेक्षा दहा पटीने अधिक त्यांच्याकडे या गोष्टी आहेत. हे त्यांनी वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक प्रयत्न करून निर्माण केलंय. त्यांचे भारत या देशावर कधी लक्ष नव्हते. आधी ती त्यांची पॉलिसी होती. चित्रं आता अगदी अलीकडे बदललंय.

माझं अगदी ठाम मत होतं की, आपल्याला पाकिस्तानची फारशी चिंता करायची गरज नाही. खरी चिंता चीनचीच आहे. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की, मी संरक्षणमंत्री असताना चीनला गेलो होतो. त्यावेळी डिफेन्स सेक्रेटरी व्होरा हेही सोबत होते. व्होरा तुम्हाला आठवत असतील. नंतर ते कश्मीरमध्ये 10 वर्षे राज्यपाल होते. तर सात दिवस मी आणि येथल्या डिफेन्स मिनिस्टरने चर्चा केली. त्यावेळी हिमालयीन बॉर्डरवर आपलं सैन्य होतं. त्यांचेही सैन्य होतं. हिमालयीन बॉर्डरवर सैन्य ठेवणं हे अत्यंत खर्चिक होते आणि हवामानाच्या दृष्टीने आपल्या जवानांसाठी त्रासदायक होतं. बर्फ वगैरे नैसर्गिक बाबींचा विचार करता तसं ते कठीणच होतं. या पार्श्वभूमीवर आम्ही सात दिवसांच्या चर्चेत आपापलं सैन्य मागे घ्यायचं यावर एकमत केलं.

त्या कराराचा ड्राफ्ट तयार केला. मी तो नरसिंह रावांकडे पाठवला. त्यावेळी ते पंतप्रधान होते. त्यांनी या कराराच्या मसुद्याला मान्यता दिली. चीनच्या पंतप्रधानांनाही हा ड्राफ्ट दाखवायचा होता. चीनच्या डिफेन्स मिनिस्टरने मला सांगितलं की, आमच्या प्राइम मिनिस्टरना हा ड्राफ्ट दाखवायला तुम्ही माझ्या सोबत चला. मी म्हटलं ठीक आहे. कुठे जायचं, कसं जायचं? तर ते म्हणाले, पंतप्रधान विश्रांतीला एके ठिकाणी गेले आहेत. कुठे गेले हे सांगितलं नाही. उद्या सकाळी आपण जाऊया, एवढंच म्हणाले. सात वाजता तयार रहा असंही त्यांनी सांगितले. मी सात वाजता तयार राहिलो. ते आल्यावर आम्ही निघालो. विमानतळावर पोहोचलो. डिफेन्सच्या विमानात बसलो. कुठे जातोय हे त्यांनी तेव्हाही सांगितलं नाही. तीन तासांनी प्लेन एका ठिकाणी उतरले. तो सागरी किनाऱयाचा प्रदेश होता.

तिथे अजिबात लोकसंख्या नव्हती. विशेष म्हणजे, जिथे विमान उतरले तिथे फक्त चांगले बंगले होते. शेवटी मी विचारलेच, कुठे आलोय आपण? त्यांनी सांगितले, कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचे जे मेंबर आहेत, त्यांच्या विश्रांतीसाठी हा सगळा परिसर आहे. इथे बाकी लोकसंख्या नाही. केवळ सागरी किनारा आहे. प्रधानमंत्री इथेच आहेत. आम्ही गेलो. त्यांना भेटलो. आमचा ड्राफ्ट त्यांना दाखवला. साधारणतः 11 वाजेपर्यंत हे सगळं उरकलं. नंतर त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं होतं. 1 वाजता. आता अकरा-साडेअकरापर्यंत ही सगळी चर्चा होती. ती संपली होती. आम्ही मोकळे झालो होतो. जेवण होईपर्यंत तिथे कुठे जायलाही जागा नाही. शहर नाही, गाव नाही, आसपास काही नाही. तास-दीड तास कसा घालवायचा हा विचार मी करत होतो. तेवढय़ात त्यांच्या प्राइम मिनिस्टरनी सुचवलं, लेटस् वॉक! समुद्रकिनाऱ्यावर आपण चालूया. छान सागरी किनारा आहे. मी मनात म्हटले, ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. यानिमित्त त्यांच्याशी बोलता येईल. मग आम्ही त्या किनाऱ्यावर चालत होतो. तास-सव्वा तास मी अनेक प्रश्न त्यांना विचारत होतो. मला ते एकच गोष्ट सांगायचे की, माझं सगळं टार्गेट अमेरिका आणि जपान आहे. ही तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चीनला जगाची आर्थिक महासत्ता बनवायची आहे, असे ते वारंवार सांगत होते. अमेरिकेच्या तोडीस तोड चीन उभा राहू शकतो हे चित्र जगाला दाखवायचंय. अमेरिकेच्या नंतर किंवा त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या अधिक पुढे गेलेला देश चीन आहे हे मला दाखवायचे आहे. हे त्यांचं स्वप्न होतं. ते हे स्वप्न अभिमानाने सांगत होते. ही सगळी चर्चा झाल्यावर मी सहज त्यांना विचारलं, तुमच्या शेजारी देशांबद्दल काय धोरण राहणार? तर ते हसले, म्हणाले, आमचं टार्गेट अमेरिका आणि जपान आहे. शेजारी राष्ट्रांचा तूर्त आम्ही विचार करीत नाही. बघू, पाच-पंचवीस वर्षांनी विचार करू. हे ऐकताच माझ्या डोक्यात आलं, उद्या हिंदुस्थानच्या समोर संकट आलं तर ते आज नाही, पंचवीस-तीस वर्षांनी येईल.

चीनची समस्या लष्करी शक्तीने सुटणार नाही

'जवाहरलाल नेहरूंच्या काळात, इंदिरा गांधींच्या काळात किंवा अटल बिहारींच्या काळात परराष्ट्र धोरणात काही फरक नव्हता आणि आजही कमी जास्त प्रमाणात तेच चालू आहे. फक्त मधे मोदी साहेब आल्यानंतर त्यांनी काही वेगळा प्रयत्न करण्याचा दृष्टिकोन घेतला असं दाखवलं होतं, पण ते खरं टिकलं नाही. आज परराष्ट्र खातं बघितलं आणि त्या खात्याची संपूर्ण यंत्रणा बघितली, आपले राजदूत बघितले की, जी जुनी आपली नीती होती, त्यापेक्षा वेगळी नीती आपण घेतलेली नाही हे दिसून येतं.”

आजच्या मुलाखतीतीतल आणखी काही महत्त्वाचे मुद्दे:

'सहामाही परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झालाय'

'आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे, पण त्या परफॉर्मन्सवरून तरी प्रॅक्टिकलमध्येसुद्धा हे सरकार यशस्वी होईल असा आता ट्रेंड दिसतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करून तुम्ही विचारत असाल तर या सहा महिन्यांत परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल अशी खात्री आहे.' असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. 

'कोरोनामुळे उद्योगधंद्यांवर मोठं संकट'

'महाराष्ट्राचं वैशिष्टय़ मुळी आहे ते कारखानदारी आणि औद्योगिकीकरण. पण कोरोनामुळे महिनोन्महिने कारखाने बंद, कामगारांना काम करायला संधी नाही. कारखानदारी पूर्ण संकटात गेली. कोरोनाच्या या संकटामुळे अर्थव्यवस्था अतिशय अडचणीत आली आणि तिथे काम करणाऱया माणसाचा रोजगार संकटात आला. बजाज ऑटोसारख्या काही कारखानदारांनी कामगारांचं वेतन दिले, पण तेही आता विचार करू लागलेत की, आपण किती दिवस वेतन देऊ शकणार? ज्या उद्योगांची वेतन देण्याची कुवतच नव्हती त्या ठिकाणच्या कामगारांचा, कष्टकऱयांचा प्रपंच चालवायचा कसा, त्यांचं घर चालवायचं कसं हे यक्षप्रश्न घराघरातून निर्माण झालेले आपण पाहिलेले आहेत.' अशी चिंता पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे. 

'सरकारची आवक आता थांबलेली आहे'

'होय, राज्य सरकारचं उत्पन्नच घटलं हे खरे आहे. यासंदर्भात मी अधिकाऱयांकडून माहिती घेत होतो की, तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचं बजेट मांडलं आणि त्यानंतर कोरोना आला. बजेट मंजूर झाल्यावर कोरोना आला. आता त्या बजेटमध्ये राज्याच्या उत्पन्नाचा काय विचार केला होता? तो आकडा काहीतरी 3 लाख 90 हजार कोटींच्या आसपास होता. माझा आकडा कदाचित चुकत असेल, पण असा काहीतरी आकडा होता. ठीक आहे. आता त्यानंतर हे तीन महिने असेच गेले. सरकारची आवक थांबली. या काळात किती उत्पन्न येईल याचं कॅलक्युलेशन जर केलं तर जो आपण मूळ आकडा गृहीत धरला होता, त्याच्यात 50 टक्क्यांच्यापेक्षा जास्त फटका या तीन महिन्यांतच बसला असं दिसतं. याचा अर्थ सरकारचीसुद्धा आर्थिक ताकद घटायला लागलेली आहे. यालाच आपण आर्थिक संकट म्हणू शकतो.' असंही पवार यावेळी म्हणाले. 

'मी मोदींचा गुरु आहे असं म्हणून मला अडचणीत आणू नका'

'मी त्यांचा गुरू आहे असे म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. गुरू वगैरे सोडा, राजकारणात कुणी कुणाचा गुरू वगैरे असत नाही. आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही. बाकी राहिला मुद्दा अर्थव्यवस्थेसंबंधीचा. तर मला स्वतःला असं वाटतं की, या सगळय़ा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी एक गृहस्थ इथे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. दुर्दैवाने काय झालं मला माहीत नाही, ते सोडून गेले. आता अशी जी माणसं आहेत, ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा डॉ. मनमोहन सिंगांसारखे लोक आहेत.' असं म्हणत पवारांनी पंतप्रधान मोदींना कानपिचक्या दिल्या आहेत. 

दरम्यान, या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग उद्या (१३ जुलै) प्रसारित होणार आहे. यावेळी शरद पवार राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती आणि भाजपचं सुरु असलेलं राजकारण यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी