विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिमंडळाचा 'या' तारखेला विस्तार

राज्याचे विधिमंडळाचे  पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला असून त्यापूर्वी म्हणजे १४ तारखेला राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

state cabinet meeting
मंत्रालयात विविध विषयांसंदर्भात बैठक झाली  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई :  राज्याचे विधिमंडळाचे  पावसाळी अधिवेशन येत्या १७ तारखेला असून त्यापूर्वी म्हणजे १४ तारखेला राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे खांदेपालट तसेच मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून नाराज झालेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रीपदी विराजमान करण्याचाही या मंत्रिमंडळ विस्ताराचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. यात बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाल्याचे समजते आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले नाराज आमदार अब्दुल सत्तार  आणि मुंबईचे बंडखोर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले असल्याचे माहितीही समोर येत आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात येईल आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. 

सध्या हा विस्तार करण्यात आला तरी नव्याने मंत्रीमंडळात दाखल झालेल्या मंत्र्यांना केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत किती विकास कामे आपल्या प्रभाव क्षेत्रात वळविण्यात या नेत्यांना यश मिळते हे पाहावे लागणार आहे. तसेच मंत्री म्हणून कामगिरी करायला वाव नसल्याचे राजकीय विश्लेषकांना म्हटले आहे. 

 

 

हा मंत्रिमंडळ विस्तार एक तर भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून प्रवेश करणाऱ्या नेत्यांना खूश करण्यासाठी करण्यात येणार आहे. यात राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. तर शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांचीही वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते. तसेच दुसरे म्हणजे शिवसेनेलाही खूश करण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्तारातून करण्यात येऊ शकतो. शिवसेनेला अधिकचे मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्रीपद हे पुढील तीन महिन्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात निर्माण होऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

हे उपमुख्यमंत्रीपद शिवसेना ज्येष्ठ नेत्याला देते की युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात या पदाची माळ पडते हे येत्या १४ तारखेला पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, ज्या मंत्र्यांनी गेल्या साडेचार वर्षात जेमतेम काम केले अशांना डच्चू देण्याचाही यावेळी विचार करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक निष्क्रिय मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. 

तसेच, मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपत असलेल्या आशिष शेलार यांचीही या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू शकते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी