Heat wave in Maharashtra: नाशिक : देशातील (Country) ७० टक्के भागांत उष्णतेची लाट (Heat wave) सुरू आहे. बुधवारी देशातील ३३ शहरांत तापमान ४४ अंशाच्या वर होते. यात ७ शहरांत तापमान ४५ अंशाहून अधिक होते. दरम्यान, महाराष्ट्रात २५ हून अधिक शहरांत पारा ४१ अंशाच्या वर सरकला होता. दरम्यान हवामान विभागाने (Meteorological Department) पुढील दिवसासाठी एक गंभीर इशारा दिला आहे. राज्यात (state) भयंकर उष्णतेची लाट वाहणार असल्याचं म्हटलं आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व संलग्न भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर पुढील पाच दिवस विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.
निरभ्र आकाश, वाऱ्याची अखंडिता व समुद्रसपाटीपासून एक ते दीड किलोमीटरवर हवेचा दाब वाढल्याने उष्णतेची लाट आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत लाट कायम राहील. विदर्भात मात्र यानंतरही ही लाट कायम राहणार आहे. या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंश वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितले. आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे.
विदर्भातील प्रत्येक ठिकाणी तापमानात वाढ होत असून, बुधवारी ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. बुधवारी नाशिक, मालेगावचे तापमान चाळिशीपार गेल्याने नागरिकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागला. मराठवाड्यात औरंगाबादचे कमाल तापमान ४२.१ अंशांवर गेले होते. मुंबईचेही तापमान ३७ अंशांवर गेल्याने नागरिकांना उष्णतेच्या लाटेने हैराण केले. मुंबई वगळता उर्वरित कोकण विभागात तापमानामध्ये फारशी वाढ नोंदली गेली नाही. मात्र, राज्यात सर्वदूर कमाल तापमानाचा पारा हा ४० अंशांच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. कोल्हापूर आणि महाबळेश्वर या दोन केंद्रांवर पारा ४० अंशांच्या खाली होता. मात्र नाशिक, मालेगाव, पुणे, लोहगाव, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, तसेच औरंगाबाद, परभणी, नांदेड, तसेच विदर्भात सर्व केंद्रांवर तापमान ४० अंशांहून अधिक होते. जळगावात तापमानाचा पारा ४४ अंशांवर गेला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड या राज्यांत एप्रिलच्या अखेरच्या तीन दिवसांत तापमान वाढते राहील. १ मे रोजी उष्णतेच्या लाटेचा पीक असेल. या राज्यांत अनेक भागांत तापमान ४७-४८ अंशावर जाण्याची शक्यता आहे. २ मेपासून मात्र तापमानात घट होईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.