आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांविषयी 'हे' म्हणाले फडणवीस

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 03, 2022 | 22:21 IST

Fadnavis comment on those who opposed Aarey carshed : मुंबईत मेट्रो ३ची कारशेड आरे येथे होणे प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून तसेच व्यावहारिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे.

Fadnavis comment on those who opposed Aarey carshed
आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांविषयी 'हे' म्हणाले फडणवीस  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांविषयी 'हे' म्हणाले फडणवीस
  • सर्वोच्च न्यायालयाने कारशेडला आधीच परवानगी दिली आहे
  • कारशेडचे २५ टक्के काम झाले आहे

Fadnavis comment on those who opposed Aarey carshed : मुंबईत मेट्रो ३ची कारशेड आरे येथे होणे प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून तसेच व्यावहारिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे. जे प्रकल्पाला विरोध करत आहेत त्यांच्यापैकी काही जणांकडे अपुरी माहिती आहे तर काही जण बनावट पर्यावरणप्रेमी आहेत. ते विशिष्ट हेतूने पुरस्कृत केलेले पर्यावरणप्रेमी आहेत. पण राज्य शासन पर्यावरणप्रेमींविषयी आदर राखून आहे. यामुळे आम्ही पर्यावरणप्रेमींशी चर्चा करू आणि त्यांना वास्तवाची कल्पना देऊ, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालयाने कारशेडला आधीच परवानगी दिली आहे. कारशेडसाठी जी झाडे कापायची होती ती कापून झाली आहेत. कारशेडचे २५ टक्के काम झाले आहे. उर्वरित काम पूर्ण केले जाईल; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आरे कॉलनीचा आकार आणि त्यातील कारशेडसाठी वापरली जाणारी जागा याबाबतची माहिती घेतल्यावर पर्यावरणप्रेमींच्या मनातील शंका दूर होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. कारशेडसाठी कापलेली झाडे त्यांच्या पूर्ण आयुष्यात जेवढा कार्बन शोषणार होती त्याचे एका निश्चित सूत्राने गणित मांडले आहे. या समीकरणातून आलेला आकडा आणि मेट्रो कार्यरत झाल्यामुळे रस्त्यावरील वाहने कमी होऊन प्रदूषणात होणारी घट याबाबतचा आकडा यांची तुलना केली असता मेट्रो प्रकल्प करणे जास्त व्यावहारिक आहे. मेट्रो प्रकल्प हे मुंबईसाठी वरदान आहे पण कारशेडला विरोध करून मेट्रो प्रकल्प रखडविल्याने मुंबईचे नुकसान होत आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कारशेडचे काम थांबवल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात आतापर्यंत दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. काम जेवढे लांबेल तेवढाच हा खर्च वाढेल आणि मेट्रो प्रकल्प म्हणजे नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था होईल. याउलट वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला तर झालेली हानी भरून काढण्यासाठीचे नियोजन करता येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या प्रकरणावर बोलले फडणवीस

अमरावती येथे उमेश कोल्हे यांची हत्या झाली. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. आधी या प्रकरणात लूट करण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले होते. हा निष्कर्ष त्यांनी प्राथमिक तपासातून काढला होता की त्याला काही वेगळे कारण होते याची अंतर्गत चौकशी केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उमेश कोल्हे यांची हत्या आणि राजस्थानमध्ये उदयपूर येथे कन्हैय्यालाल यांची झालेली हत्या यात काही साधर्म्य आढळले आहे. या हत्यांमागचे उद्देश चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे एनआयए तपास करत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी